पुणे

मेंढपाळाच्या 6 वर्षीय चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू; निरगुडसर येथील घटना

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे एका मेंढपाळाची 6 वर्षीय चिमुकली खेळताना पाय घसरून 50 फूट खोल विहिरीत पडली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. जिजाबाई संतोष दगडे (वय 6 वर्षे) असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, निरगुडसर येथील जारकरवाडी ते मेंगडेवाडी-मंचर रस्त्याच्या बाजूला ओढ्याच्या कडेला शेतकरी सुरेश किरवे यांच्या मालकीची विहीर आहे.

मेढपाळ संतोष लालू दगडे यांची मेंढरे ओढ्यावरील पाणी पिण्यासाठी आली. पाणी प्यायल्यानंतर मेंढ्या झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. झाडाखाली मुलगी व आजी सुमनबाई लालू दगडे या दोघीच होत्या. आजीला झोप लागल्याने मुलगी खेळत असताना खेळता-खेळता शेजारील विहिरीकडे गेली आणि तिचा तोल जाऊन ती विहिरीमध्ये पडली. याबाबत मुलगी बेपत्ता झाली असल्याची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

मुलगी विहिरीत पडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला बोलवून रविवारी (दि. 5) सायंकाळी मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासन व जुन्नर येथील पथकाला निरगुडसर येथील उपसरपंच आनंदराव वळसे पाटील,

तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे, पोलिस पाटील विठ्ठल वळसे, नवनाथ टाव्हरे, समीर मेंगडे, संतोष वळसे, भाऊसाहेब हांडे, प्रसाद तापकीर, धनेश टाव्हरे, संदीप घुले यांनी सहकार्य केले. मंचर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून तपास पोलिस जवान नीलेश खैरे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT