पुणे

मिनी ऑलिम्पिक लांबण्याची शक्यता

अमृता चौगुले

सुनील जगताप

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाकडून नियोजन करण्यात येणार असून, सद्यःस्थितीत नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे खातेवाटप न झाल्याने या स्पर्धा रखडल्या आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने पुन्हा नव्या स्वरुपात आणि सर्व खेळाडूंना सहभागी करून घेत मिनी ऑलिम्पिक भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी लागणारा निधीही मंजूर करण्यात आला असून, शासनाच्या सहयोगाने आणि आयोजन समितीचे अध्यक्ष क्रीडामंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडणार होत्या.

मात्र, गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर नव्याने सरकार सत्तेत आले आहे. या सरकारकडून अद्याप कोणत्याच खात्यांचे वाटप झाले नसल्याने क्रीडामंत्री राज्याला मिळालेला नाही. क्रीडा खात्याला मंत्री मिळाल्यानंतरच स्पर्धेचे पुढचे भवितव्य ठरणार आहे. ही मिनी ऑलिम्पिक स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर होणार असून, 32 विविध क्रीडा प्रकारात होणार आहे. विविध खेळ प्रकारातून राज्यातील सर्व जिल्हा संघातील पुरुष व महिला खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, इतर अधिकारी व पदाधिकारी असे मिळूण एकूण 9500 जणांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पुणे जिल्ह्याला मिळाले असून, म्हाळुुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल हे स्पर्धेचे मुख्य ठिकाण असणार आहे; तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या क्रीडा संकुलांत स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

असोसिएशनकडून तयारी
राज्यात मिनी ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याबाबत असोसिएशनकडून संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली होती. असोसिएशनबरोबर महाराष्ट्र शासनही आयोजनाची महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आयोजन समितीचे अध्यक्ष राज्याचे क्रीडामंत्री असणार आहेत. सद्यस्थितीत क्रीडामंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा थांबविलेली आहे. परंतु, लवकरच क्रीडामंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम बैठक घेऊन पुढचे नियोजन केले जाईल.

                   – नामदेव शिरगावकर, (सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT