पुणे

वडगाव मावळ : मावळातील आठ गावे भूस्खलन संवेदनशील

अमृता चौगुले

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यात माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार 8 गावे भूस्खलन संवेदनशील असून संबंधित गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे; परंतु संबंधित गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना होणार की नाही? ही गावे कायमच धोक्यात राहणार का? या गावांचे पुनर्वसन कधी होणार? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
मावळ तालुक्यात प्रामुख्याने घाटमाथा व डोंगरी भाग असलेल्या पश्चिम पट्ट्यात लोणावळा, खंडाळा, पवना धरण परिसर, नाणेमावळ या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तर पूर्व भागात त्यापेक्षा कमी परंतु, जोरदार पाऊस पडतो. वळवाचा पाऊस तसेच अतिवृष्टीचा पाऊस हा शक्यतो हानिकारक ठरतो. तालुक्यात डोंगरी भाग असल्यामुळे डोंगराच्या कुशीत अनेक गावे वसलेली आहेत.

यामध्ये प्रामुख्याने बोरज, कळकराई(सावळा), भुशी, माऊ, तुंग, मालेवाडी, ताजे, लोहगड ही आठ गावे भूस्खलनदृष्ट्या संवेदनशील आहेत. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार ही गावे संवेदनशील ठरविण्यात आलेली आहेत. संबंधित गावे ही डोंगराच्या कुशीत, डोंगर पायथ्याला असल्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांनी शक्यतो स्थलांतरित व्हावे अशी सूचना देण्यात आली आहे. गतवर्षी तुंग किल्ल्याच्या पायथ्याला सुमारे 300 मीटर भूस्खलन होऊन तुंग येथील रहिवासी सीताराम पठारे यांचे घर जमीनदोस्त झाले होते.

याशिवाय आंदरमावळ भागातील कल्हाट येथील डोंगरावर भूस्खलन होऊन तेथील तासुबाई देवीच्या मंदिराच्या आवारात दरड कोसळली होती. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही, परंतु धोका मात्र कायम आहे. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी मान्सूनपुर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन दक्षतेच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित सुचनांची अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते.

पुरातत्व विभागाने एकविरा देवी डोंगरावरील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करावी, पावसाळ्यात ज्या भागामध्ये पाणी शिरते त्या भागातील घरांची यादी, नागरिकांची संख्या याचा तपशील संबंधित ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेने द्यावा, जलसंपदा विभागाने सर्व बंधारे, धरणे यांचे ऑडीट करून आवश्यक ठिकाणी तात्काळ डागडुजी करावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व पुलांचे ऑडिट करून दुरुस्ती करावी.

वीज वितरण कंपनीने धोकादायक ठरणारी झाडे काढावीत, पावसाळ्यामध्ये शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करावे, कृषी विभागाने अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास तात्काळ पंचनामे करण्याचे नियोजन करावे, रस्ते विकास महामंडळाने धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तलाठी, ग्रामसेवक यांनी धोकादायक ठिकाणांची यादी तयार करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात. आरोग्य विभागाने आपत्कालीन परिस्थितीत स्थापन केलेल्या मदत कक्षाचे फलक दर्शनी भागात लावावेत व आपत्तीकाळात जीवितहानी झाल्यास तात्काळ माहिती द्यावी अशा सूचना संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. परंतु या सूचनांची अंमलबजावणी होते का,हा प्रश्नच आहे. त्यामुळे संबंधित गावे ही वर्षानुवर्षे धोकादायक स्थितीतच आहेत.

मावळातील धोकादायक अवस्थेतील गावे
पवन मावळ : लोहगड, धालेवाडी, मालेवाडी, तिकोणापेठ, खडक गेव्हंडे, आतवण, तुंग, मोरवे, कादव, शिळींब, चावसर, शिंदगाव, आंबेगाव, दुधीवरे, बेडसे, पाचाणे, ओव्हळे, दिवड, मळवंडी ठुले.

नाणे मावळ : भाजे, पाटण, ताजे, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, ओळकाईवाडी, देवले, पाले, नेसावे, करंजगाव, थोराण, जांभवली.

आंदर मावळ : खांडी, कुसुर, कशाळ, कल्हाट, भोयरे, मोरमारेवाडी, वडेश्वर, फळणे, वाउंड, माऊ, साई, कुसवली, किवळे, पारिठेवाडी.

भूस्खलनदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या गावांना यापूर्वीच शक्यतो स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय खात्याच्या अधिकार्‍यांना पावसाळा पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना केल्या होत्या. त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तरीही संबंधित गावातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

                                             -मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ.

SCROLL FOR NEXT