माळेगाव; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील निरा- बारामती राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तब्बल 8 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झाल्याने रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. रस्त्याचे काम करताना दर्जा राखला जावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे
गेले अनेक वर्षे या मार्गाच्या चौपदरीकरणाची नुसतीच चर्चा होत होती, आत मात्र कामाला सुरुवात झाली आहे. माळेगाव शनिमंदिर चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज या दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने होणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक व पथदिव्यांची व्यवस्था केली जाणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा अडचणीची ठरणारी झाडे तोडण्याचे काम केले जात आहे.
विकासासाठी निधी कमी पडणार नाही
बारामती तालुक्यात नावारूपाला आलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या विस्तारीकरणात वाढ होत आहे. भविष्यातील रस्ते, दिवाबत्ती, गटारे आदी विकासकामांसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी युवानेते रविराज तावरे यांनी व्यक्त केला.