पुणे

माळेगाव पोलिस ठाणे सुरू करण्याच्या हालचाली; अधिसूचना प्रसिद्ध

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रुक व सुपे या दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होत आहे. त्यातील माळेगाव पोलिस ठाण्याचे कामकाज 15 ऑगस्टपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती तालुका व वडगाव निंबाळकर या दोन पोलिस ठाण्यांचे विभाजन केले जाणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करीत माळेगावच्या हद्दीत येणारी गावे निश्चित केली आहेत.

माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, सांगवी, शिरवली, खांडज, पाहुणेवाडी, जळगाव कडेपठार, अंजनगाव, कर्‍हावागज, भिलारवाडी, निरावागज, घाडगेवाडी, येळेवस्ती, कांबळेश्वर, ढाकाळे, मानाप्पावस्ती, धुमाळवाडी, पवईमाळ, पणदरे, सोनकसवाडी, नेपतवळण व मेडद या गावांचा समावेश आहे.

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आता वडगाव निंबाळकर, कोर्‍हाळे बुद्रुक, कोर्‍हाळे खुर्द, थोपटेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, लोणी भापकर, पळशी, वाकी, चोपडज, मुढाळे, सायंबाचीवाडी, मासाळवाडी, करंजे, निंबूत, मुर्टी, मोढवे, मुरुम, खंडोबाचीवाडी, गरदडवाडी, वाघळवाडी, सोरटेवाडी, मगरवाडी, जोगवडी, चौधरवाडी, वाणेवाडी, मोराळवाडी, करंजेपूल, लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, पांढरवाडी, पिंगळेवस्ती, बंजरंगवाडी, खामगळवाडी व शिरष्णे ही गावे राहणार आहेत.

बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उंडवडी कडेपठार, गोजूबावी, जराडवाडी, बर्‍हाणपूर, शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, कटफळ, पारवडी, निंबोडी, जैनकवाडी, काटेवाडी, कन्हेरी, सावळ, ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, मेखळी, सावंतवाडी, रुई, तांदूळवाडी व वंजारवाडी ही 22 गावे उरणार आहेत. स्वतंत्र अधिसूची प्रसिद्ध करून सुपे पोलिस ठाण्यातील गावे निश्चित केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या वडगाव पोलिस ठाण्याकडे 37 गावे दाखविण्यात आली आहेत.

इमारतींची कामे प्रगतिपथावर
माळेगाव व सुपे येथे पोलिस ठाणे इमारतीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. याशिवाय बारामतीत शहर पोलिस ठाण्यासाठी प्रशासकीय भवनासमोर स्वतंत्र इमारत उभी राहत आहे. त्याच्या लगतच अपर पोलिस अधीक्षक कार्यालय व वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र इमारत बांधली जात आहे. शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयालगत पोलिस कर्मचार्‍यांना निवासस्थानासाठी बहुमजली इमारत बांधली जात आहे. ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

भौगोलिकदृष्ट्या बदल अपेक्षित
माळेगाव पोलिस चौकीत निरावागज व लगतच्या सोनगाव, मेखळी परिसराचा समावेश आवश्यक होता. परंतु, ती गावे बारामती पोलिस ठाण्यात राहिली आहेत. तीच बाब वडगावबाबतीत आहे. शिरष्णे व बाजूची गावे माळेगावला लगत असली तरी ती वडगावलाच कायम ठेवली गेली आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT