पुणे

माळेगाव कारखान्याचा प्रतिटन 3 हजार 100 रुपये ऊसदर; पुणे जिल्ह्यात उच्चांकी

अमृता चौगुले

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला प्रतिटन 3 हजार 100 रुपये ऊसदर जाहीर केला आहे. बुधवारी (दि. 24) संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ऊसदर जाहीर केला. यावेळी उपाध्यक्ष सागर जाधव, सर्व संचालक, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 3 हजार 20 रुपये प्रतिटन ऊस दर नुकताच जाहीर केला असून सोमेश्वर कारखान्यापेक्षा माळेगाव कारखान्याने 80 रुपये प्रतिटन जास्तीचे दिले असून पुणे जिल्ह्यात अद्याप पर्यंत उच्चांकी ऊसदर दिला असल्याचे दिसते.

राज्यात अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने या आगोदर एफआरपीचे प्रतिटन 2 हजार 780 रुपये व कांडे बिल प्रतिटन 100 रुपये असे एकूण 2 हजार 880 रुपये ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना दिले आहेत. आता जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी उर्वरीत 220 रुपये प्रतिटन दिवाळीला देण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.

गेटकेन धारकांना 2 हजार 850 रुपये प्रतिटन जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी गेटकेन धारकांना प्रतिटन 2 हजार 780 रुपये दिले असून उर्वरित 70 रुपये प्रतिटन दिवाळी दरम्यान दिले जाणार आहेत. मागील गाळप हंगामात कारखान्याने 15 लाख 26 हजार 916 टन एवढे विक्रमी ऊस गाळप केले होते.

यामध्ये सभासदांचा 8 लाख 31 हजार 174 टन तर गेटकेनचा 6 लाख 64 हजार 474 टन तसेच कार्यक्षेत्र गेटकन 31 हजार 266 टन असे एकूण गाळप केले होते. 12 कोटी 27 लाख 2 हजार 400 वीज युनिटची निर्मिती केली असून यामधील 7 कोटी 5 लाख 87 हजार 240 वीज युनिटची विक्री केली आहे. दरम्यान, आगामी गाळप हंगामाच्या कामांना वेग आला असून वेळेत सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT