पुणे

पुणे : धक्कादायक ! महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये दहावीचा पेपर ; गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या एका महिलेच्या मोबाईलमध्ये दहावीच्या गणिताच्या पेपरचा फोटो आढळून आला. त्यामुळे पेपरफुटीचा हा प्रकार असल्याचा भरारी पथकाला संशय आहे.
हा प्रकार सोमवारी (दि. 13) घडला असून, संबंधित महिलेच्या मोबाईलमध्ये पेपरचे एक पान आढळून आले आहे. भरारी पथकाला माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (दि. 15) तिचा मोबाईल त्यांनी तपासला त्या वेळी हा प्रकार समोर आल्याची माहिती बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी दिली.

याप्रकरणी, भरारी पथकाचे प्रमुख किसन भुजबळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा संतोष कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षारक्षकांना वर्गामध्ये जाता येत नाही. त्यांनी बाहेर सुरक्षेचे काम करायचे असते. असे असताना त्यांच्याकडे या पेपरचे पान कसे आले, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा बिबवेवाडी पोलिस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील यशंवतराव चव्हाण माध्यामिक विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू आहे. तेथे महापालिकेच्या सुरक्षारक्षक मनीषा कांबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची मुलगीही याच परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा देत आहे.

भरारी पथकाने बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता या केंद्राला भेट दिली. तेव्हा मनीषा कांबळे या मोबाईलमध्ये काहीतरी करत होत्या. परीक्षा सुरू असताना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही त्या मोबाईल वापरत असल्याने भरारी पथकाला संशय आला. त्यांनी त्यांचा मोबाईल तपासला असता, त्यात 13 मार्च रोजीचा गणित भाग 1 या विषयाचा इंग्रजी माध्यमाचा एन 913 विषयकोड असलेल्या प्रश्न पत्रिकेचे पान क्र. 8 /एन 913 या पानाचा फोटो काढलेला आढळला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध तसेच 13 मार्च रोजी संबंधित ब्लॉकचे सुपरवायझर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, 1982 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT