नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडीपेक्षा शिवसेना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण कुटुंबप्रमुख या नात्याने बंडखोर आमदार आणि इतर सर्वांच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. सासवड (ता. पुरंदर) येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवतारे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. त्यांच्या सज्जनपणाचा गैरफायदा घेत राष्ट्रवादीने शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न केले. पुणे जिल्ह्यात सोमेश्वर कारखाना, पीएमआरडीए समिती, जिल्हा बँक अशा तीन निवडणुका झाल्या.
तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजूला ठेवले. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीला पळविले. गुंजवणी धरणाचे पाणी बारामतीला पळवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील दिवे येथे प्रस्तावित असलेला राष्ट्रीय बाजारही राष्ट्रवादीने रद्द करत यशवंत सहकारी साखर कारखान्याची जागा निश्चित केली. हवेली तालुक्यातील फुरसुंगी-उरुळी पाणीयोजना सडवली. महापालिकेची वॉर्डरचना राष्ट्रवादीला अनुकूल करून घेताना सेनेच्या सूचनांना केराची टोपली दाखवली गेली. प्रचंड त्रास देऊन राष्ट्रवादीने जिल्ह्यात सेना संपवण्याचा जणू विडाच उचलला आहे.
आढळराव पाटील यांच्यासारखा तीन वेळा खासदार असलेला पक्षाचा शिलेदार राष्ट्रवादीच्या त्रासाने बेजार झाला आहे. 'आम्हाला केवळ जगू द्या' असे आवाहन करण्याची वेळ राष्ट्रवादीमुळे त्यांच्यावर आली. ही बाब चीड आणणारी आहे. अशीच स्थिती इतर अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेना हे आपले कुटुंब टिकवण्याला प्राधान्य द्यायला हवे. महाविकास आघाडीचा हट्ट पक्षाने कायम ठेवल्यास आम्ही महाविकास आघाडीत राहू इच्छित नाही. तसा ठराव पुरंदर तालुका कार्यकारिणी, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि शिवसैनिकांनी केला असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले आहे.
संजय राऊतांना आवरा
बंड झाल्याच्या पहिल्या दिवसापासून स्वतः मुख्यमंत्री समन्वयाच्या भूमिकेत आहेत. दुसर्या बाजूला संजय राऊत मात्र रोज उठून बंडखोरांना आव्हान देत आहेत. असंसदीय भाषा वापरत आहेत. पक्ष एकसंध राहावा ही भावना त्यांच्या एकंदरीत वर्तनातून दिसत नाही. त्यांना आवरावे अशी माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.