पुणे

महाळुंगेत बैलपोळा मिरवणूक साडेसात तास रंगली; 200 हून अधिक बैलांचा सहभाग

अमृता चौगुले

महाळुंगे पडवळ; पुढारी वृतसेवा: जिल्ह्याच्या उत्तर भागातील सर्वात मोठा श्रावणी बैलपोळा महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बैलांच्या शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या काढण्यात आलेल्या मिरवणुका लक्षवेधक ठरल्या. जवळपास 200 हून अधिक बैल मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्वप्रथम देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद व माजी आमदार कै. अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वर्षी सरपंच सुजाता चासकर यांच्या बैलाला प्रथम पूजेचा मान मिळाल्यामुळे पोलिस पाटील सविता पडवळ व सरपंच यांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गुलाल, भंडाराची उधळण करीत पारंपारिक वाद्यांसह सुमारे 10 डीजेच्या तालावर बैलांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत बळिराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजासमोर बेधुंद होऊन नाचत होता. दुपारी दोन वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री साडेनऊ वाजता संपली. शेतात वर्षभर काबाड कष्ट करणार्‍या बैलांचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला. या वेळी मंचर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी बंदोबस्त ठेवला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT