पुणे

महापालिकेत 500 जागांच्या भरतीची तयारी पूर्ण; पुढील आठवड्यात जाहिरात निघणार

अमृता चौगुले

पुणे : महापालिकेच्या विविध पदांसाठीच्या 500 रिक्त जागांच्या भरतीची तयारी पूर्ण होत आली आहे. त्यानुसार या भरती प्रक्रियेसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ही प्रक्रिया केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये राज्य शासनाने मंजूर केली आहे. त्यानुसार नव्या पदांची निर्मिती झाली असून, गेल्या आठ ते दहा वर्षांत रिक्त पदांची संख्या जवऴपास 10 हजारांपेक्षा अधिक आहे. दरम्यान, आता राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविली आहे. त्यामुळे पालिकेत अत्यावश्यक विविध पदांसाठी पहिल्या टप्प्यात जवळपास चारशे ते पाचशे रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

त्यासाठीची रोस्टर तपासणी जवळपास पूर्ण होत आली आहे, केवळ दोन पदांचे काम शिल्लक आहे, ज्या पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, अग्निशमन दल यासह अन्य पदांची भरती होणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य, म्हाडा, शिक्षण विभागातील भरतीमध्ये घोटाळा झाल्याने महापालिकेच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या 'आयबीपीएस' संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी पालिकेने करार केला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

भरतीची परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांत

महापालिकेच्या या भरती प्रक्रियेची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. एकूण पदांची संख्या लक्षात घेता काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी परीक्षा पुणे शहरात शक्य होणार नाही. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यांसह इतर शहरांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT