कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: पाण्याची गळती होत असलेल्या व्हॉल्व्हची गेल्या पंधरा दिवसांत तीनदा दुरुस्ती करूनही कोंढवा परिसरातील कमी दाबाने पाणी मिळण्याचा प्रश्न सुटला नाही. शनिवार, रविवारी तर दुरुस्ती करताना अचानक झालेल्या बिघाडामुळे व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. परिणामी, जवळच्या दीड एकर जमिनीमध्ये पाण्याचे अक्षरश: तळे साचले होते. यामुळे शेतीचे नुकसान झाले असून, महंमदवाडी परिसराला तब्बल दोन दिवस पिण्याचे पाणी नाही.
महंमदवाडी, कृष्णानगर मुख्य चौकातील व्हॉल्व्हमधून परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी सोडले जाते, त्याच व्हॉल्व्हमधून गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गळती होत होती. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींनी वारंवार पालिका प्रशासनाला याची माहिती दिली होती. मात्र, त्याकडे काणाडोळा केला जात होता, असा आरोप नागरिक करीत आहेत. दररोज होणार्या पाण्याच्या गळतीमुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी केलेला डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे.
सतत रस्त्यावरून वाहणारे पाणी रस्त्यावरून पोपटराव आंबेकरांच्या शेतामध्ये जात होते. यामुळे शेतामध्ये लावलेला पालक, मेथी, कोथिंबीर, कांद्याचे टाकलेले बियाणे या मातीतच कुजून गेले. या गळतीमुळे नुकसानीबरोबरच महंमदवाडी परिसराला गेल्या दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी आले नाही. पाणीपुरवठा आधिकार्यांशी संपर्क साधला असता, व्हॉल्व्हदुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा अधिकार्यांना व्हॉल्व्हमधून होणार्या पाणीगळतीविषयी लेखी व तोंडी स्वरूपात सांगितले. याचीही कसलीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली; मात्र पाणीगळती थांबली नाही. आमच्या शेतात येणार्या सततच्या पाण्यामुळे फळकाढणी आणि भाजीपाल्याचा एक हंगाम वाया गेला आहे. त्यात आमचे बरेच नुकसान झाले. शिवाय, पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण भागाला गेली दोन दिवस पाणी नाही.
पोपटराव आंबेकर, नुकसान ग्रस्त शेतकरी