दिवे : पुढारी वृत्तसेवा : दिवे घाटापासून पूर्वेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत दिवे-सोनोरी- खालच्या बाजूला म्हातोबाची आळंदी, अशा त्रिवेणी संगमावर बांधलेल्या सोनोरी किल्ल्यावर सध्या पर्यटकांनी गर्दी केली आहे. शेवटी सरदार पानसे यांनी बांधलेल्या या किल्ल्याला मल्हारगड असेही संबोधले जाते. किल्ल्यावर शंभू महादेव व खंडोबाची भव्य मंदिरे आहेत. विहिरी, भव्य तळे, विशाल तटबंदी, भव्य कोरीव कमानी आहेत. बरीच वर्षे हा किल्ला दुर्लक्षित होता, मात्र अलीकडील काळात काही समाजसेवी संस्था, दिवे-सोनोरी ग्रामस्थांच्या सहकार्याने किल्ल्याचा कायापालट होत आहे.
किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. किल्ल्यावर भव्यदिव्य अशी सागवानी दरवाजा चौकट बसवली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी मध्यापर्यंत रस्ता केला आहे, त्यामुळे अलीकडच्या काळात या किल्ल्यावर पर्यटकांची संख्या वाढत आहे.
हडपसरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला असल्याने सुटीच्या दिवशी शनिवार व रविवारी किल्ला गर्दीने फुलून जातो. सध्या या परिसरात बर्यापैकी पाऊस झाल्याने किल्ल्याचा परिसर हिरवाईने नटलेला आहे.
त्यामुळे पर्यटक आवर्जून मल्हारगडावर भेट देत आहेत. किल्ल्यावर विजेची व्यवस्था तसेच सध्या किल्ल्यावर जाण्यासाठी काळेवाडी मार्गे पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे, परंतु पायथ्यापासून ते गडापर्यंत रस्ता पावसाने खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती सोनोरीच्या बाजूनेही झाली तर या सर्वच परिसराचा कायापालट होणार आहे. सध्या हा परिसर अंजीर- सीताफळाचे आगर म्हणून ओळखला जातो.
बरेच शेतकरी अंजीर, सीताफळ, भाजीपाला किल्ल्याच्या पायथ्याशी विक्रीसाठी बसतात. काही शेतकर्यांनी घरगुती हॉटेल सुरू केली आहेत. शहरी पर्यटक त्याकडे आकर्षित होतात. शेतकर्यांना जोडधंदा म्हणून चार पैसे हातात पडतात, परंतु किल्ल्यावरील अपूर्ण कामे जर पूर्ण झाली, तर या परिसराचा कायापालट होणार आहे, असे जलसेवक सागर काळे व सतीश शिंदे यांनी सांगितले.