पुणे

मनाई झुगारून तरुणाईचा जल्लोष; किल्ले सिंहगड, राजगडावर मध्यरात्रीनंतरचा प्रकार

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: मनाई झुगारून सिंहगड, राजगड किल्ल्यावर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तरुणाई जल्लोष करीत आहे. तर, दुर्गम राजगड, तोरणागडावर शेकडो पर्यटक मुक्काम करीत आहेत. सिंहगड, राजगडसारख्या अत्यंत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संरक्षित स्थळांच्या पावित्र्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सध्या गडकोटांच्या परिसरात दाट धुक्यासह रिमझिम पाऊस पडत आहेत. कडेकपार्‍या, बुरुजातील पाऊलवाटा धोकादायक बनल्या आहेत. रात्री तसेच पहाटे अनेक जण गडकोटांवर भटकंती करीत आहेत.

त्यामुळे खोल दरीत पर्यटक कोसळून तसेच हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दुर्घटनांची भीती आहे. असे असेल तर वन तसेच पुरातत्व खात्याचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.  शनिवारी राजगड किल्ल्यावर पाचशेहून अधिक पर्यटक मुक्कामी थांबत आहेत. रविवारी गडावर राज्यासह देशभरातील सहा ते सात हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. रिमझिम पाऊस, दाट धुक्यात पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. तरुणाईसह महिला, मुले, नागरिकांनी पद्मावती मंदिर, राजसदरेचा परिसर अक्षरशः हाऊसफुल्ल झाला.

धोकादायक कठड्यानजिक प्रेमीयुगुलांचा धुडगूस
सिंहगडावर जाण्यास सायंकाळनंतर पर्यटकांना मनाई आहे. असे असताना अवसरवाडी तसेच डोणजे गोळेवाडी मार्गे घाटरस्त्याने रात्री-अपरात्री गडावर जाऊन प्रेमीयुगुल अक्षरशः धुडगूस घालत आहेत. चारचाकी तसेच दुचाकी वाहना़वरून येणारे प्रेमीयुगुल घाटरस्त्याच्या लगत असलेल्या घनदाट जंगलात तसेच धोकादायक कड्याच्या कठड्यावर बसून मौजमजा करीत आहेत. गडावरील वाहनतळापासून पुणे दरवाजापर्यंत अनेक जण रात्रीच्या अंधारात भटकंती करतात. जिवाची पर्वा न करता मोबाईलवर सेल्फी काढण्यापासून बुरुजावर बसून मौजमजा करण्यात मग्न असतात.

सिंहगडाच्या दोन्ही तपासणी नाक्यांवर रात्री दहा वाजेपर्यंत सुरक्षारक्षक थांबतात. मात्र, रात्री-अपरात्री काही उन्मत्त पर्यटक जात असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाच्या वतीने तातडीने आवश्यक खबरदारी घेतली जाणार आहे. उन्मत्त प्रेमीयुगुल, पर्यटकांना प्रतिबंध करण्यासाठी रात्रीपासून सकाळपर्यंत सशस्त्र माजी सैनिक टोल नाक्यावर तैनात करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

                         – बाबासाहेब लटके, अधिकारी , सिंहगड वन विभाग

SCROLL FOR NEXT