मंचर : रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथे चाललेल्या महिलेचे 96 हजार रुपयांचे दागिने हातचलाखी करून एकाने पळविले. याबाबत लता सुरेश भालेराव (रा. पाटीलवाडा, मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता भालेराव सकाळी मंचरला रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी गेल्या होत्या.
त्या एका स्टोअरजवळ उभ्या असताना 30 ते 35 वय असलेल्या अनोळखी व्यक्तीने भालेराव यांना, 'शेजारच्या गल्लीमध्ये आम्ही गरीब लोकांना धान्य, कपडे व पैसे वाटप करीत आहोत. तरी तुम्ही माझ्यासोबत चला,' असे सांगितले. भालेराव त्याच्यासोबत जाण्यास निघाल्या असता सदर अनोळखी व्यक्तीने गळ्यातील दागिने काढून ठेवण्यास सांगितले.
भालेकर यांनी दीड तोळ्याचे मंगळसूत्र व अर्धा तोळ्याचे डोरले काढून स्वतःच्या हातात ठेवले. अनोळखी व्यक्तीने 'मंगळसूत्र व डोरले पुडीत बांधून ठेवतो,' असे म्हणत भालेराव यांच्यासमोर पुडी बांधली. त्यानंतर तो निघून गेला. भालेकर यांनी हातातील पुडी उघडून पाहिली असता त्यात दागिने नव्हते. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच भालेकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.