मंचर, पुढारी वृत्तसेवा: कांद्याचे बाजारभाव अजूनही वाढत नसल्याने शेतकर्यांनी साठवलेला कांदा अजूनही बराखीतच पडला असून, भाव कधी वाढणार? याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागीलवर्षी मार्च, एप्रिल, मे मध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची काढणी झाली आणि हा कांदा त्यावेळेस बाजारभाव कमी असल्याने शेतकर्यांनी बराखीत साठवून ठेवला आहे. सध्या कांद्याला दहा किलोस प्रतवारीनुसार 100 ते 150 रुपये असा बाजार भाव मिळत आहे; परंतु हा बाजारभाव शेतकर्यांना एकूण उत्पादनावरील भांडवली खर्च पाहता परवडत नाही. शेतकरी या बाजार भावाला कांदा विक्री मोठ्या प्रमाणात करत नाही.
कांद्याला कमीतकमी 170 ते 200 पेक्षा जास्त बाजारभाव होईल. त्याच वेळी शेतकर्यांना भांडवली खर्च वजा जाता हातात बर्यापैकी रक्कम शिल्लक राहते. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव दोनशेचा टप्पा कधी गाठणार, याकडे लक्ष्य लागून राहिले आहे. सध्या बराखीतील कांदा किती दिवस टिकणार आणि बाजार नाही वाढले, तर मात्र शेतकर्यांना कमी बाजारात कांदा विकावा लागेल, त्यामुळे आहे त्या बाजारात कांदा विकावा का ठेवावा? या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे.
अनेक शेतकर्यांनी स्वतः शेतात पिकवलेला कांदा तर साठवला आहेच; परंतु काही शेतकर्यांनी मार्केटमधून शेतकर्यांचा विक्रीसाठी आलेला कांदा खरेदी करून साठवला आहे. त्यामुळे यावर्षी कांदा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला आहे. परिणामी बाजारभाव वाढले तर आवक पुन्हा वाढणार आहे. आणि आवक वाढली तर बाजार पुन्हा गडगडणार आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याचे बाजार कुठपर्यंत वाढणार, ते कधीपर्यंत वाढणार आणि त्यासाठी शेतकर्यांना किती वाट पाहावी लागेल, हे पाहावे लागणार आहे.