भोर; पुढारी वृत्तसेवा: निराधार, श्रावणबाळ तसेच अन्य योजनेतील लाभार्थ्यांनी 1 एप्रिल 22 पासूनचे उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. वेळोवेळी आवाहन करूनही लाभार्थी त्याची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. जे लाभार्थी दाखले देणार नाहीत, त्यांचे अर्थसाहाय्य बंद केले जाईल, असा इशारा भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिला. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून निराधारांसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनांचा लाभ घेणार्यांना शासनाने 1 एप्रिलनंतर नवीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक केले आहे.
भोर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या विविध योजनांचे 7503 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत आहे. मात्र, 20 टक्के लाभार्थ्यांनी उत्पन्न दाखले तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत. जे लाभार्थी उत्पन्नाचे दाखले सादर करणार नाहीत, त्यांचे अर्थसाहाय्य शासन आदेशान्वये बंद करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना दाखले मिळावेत, यासाठी मंडलनिहाय खालील तारखांना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेऊन उर्वरित लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड, बँक पुस्तक, रेशन कार्ड, मुलांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत तत्काळ जमा करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
मंडलाचे नाव – निगुडघर –
दि. 27, संगमनेर – दि. 29, भोर – दि. 30, भोलावडे – दि. 30, आंबवडे – दि. 2 सप्टेंबर, नसरापीर – दि. 2,
वेळू – दि. 2.