पुणे

भोर : वरंध घाट बंदमुळे हॉटेल व्यावसायिक कर्जबाजारी

अमृता चौगुले

अर्जुन खोपडे

भोर : कोकणाला जोडणारा भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील वरंध घाट काहीना काही कारणामुळे सलग तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे या मार्गावरील हॉटेल व्यावसायिक, लहान-मोठे व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोना, अतिवृष्टी, रस्ता दुरुस्ती या कारणामुळे सलग तीन वर्षे वरंध घाट सातत्याने बंद राहत आहे. त्यामुळे भोर-महाड मार्गावरील हॉटेलचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. महिन्यापूर्वी बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची पाहणी करून वरंध घाटातील मार्ग सर्व वाहनांसाठी खुला केला होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांबरोबरच एसटीसेवाही सुरू झाली होती.

त्यामुळे या भागातील हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय सुरळीत होणार म्हणून पाऊस काळात लागणारा माल भरला. आधीच अडचणीत असताना काहींनी उसने पैसे घेऊन, तर काहींनी कर्ज काढून माल भरला. परंतु, दहा-पंधरा दिवसांतच वरंध घाटातील वाघजाई मंदिर दरडी कोसळल्या, तर उंबर्डेवाडी येथे रस्त्याला भेगा पडल्याने प्रशासनाने घाट सर्व वाहनांसाठी तीन महिन्यांसाठी बंद केला. परिणामी, हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले. कोरोना निर्बंध हटविल्याने या हंगामात चांगला व्यवसाय होईल, या आशेवर असलेले हॉटेलचालक यामुळे हतबल झाले आहेत. या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे, गटारे, मोर्‍या सफाईची कामे, झाडी-झुडपे हटविण्याबरोबरच पावसाळ्यात मार्ग कसा चालू राहील, यासाठीची सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणे गरजेचे होते.

परंतु, निधी मंजूर असूनही वारवंड येथील मोरी, उंबर्डेदरम्यान घाटातील दुरुस्ती, संरक्षण भिंत, कठडे याचबरोबर नीरा-देवघर धरण रिंग रोडवरील शिरगाव ते दुर्गाडीदरम्यानची वाहून गेलेली मोरी, कुडली व शिरवली येथील तुटलेला व खचलेला रस्ता तसेच जागोजागी दरडींमुळे रस्त्याच्या कडेला आलेली माती आजही तशीच आहे. ही सर्व कामे प्रशासनाने पावसापूर्वीच पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, ठेकेदारांचा मनमानी कारभार, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा यामुळे घाट बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. हाँटेल व्यवसाय नको रे बाबा… अशीच म्हणण्याची वेळ हिर्डोशी व वरंध घाटातील हाँटेल व्यावसायिकांवर आली आहे.

सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे हा वरंध घाट वाहतुकीस खुला करून कोकणात येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय दूर करावी. तसेच हॉटेल व्यावसायिकांवर आलेले संकट दूर करावे.
                                                                    संदीप धामुनसे, हॉटेल चालक

SCROLL FOR NEXT