माणिक पवार
नसरापूर : जिल्हा परिषदेचे गट आरक्षण चुकल्याने सध्या काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने गटांची पुन्हा सोडत होणार आहे. याचा परिणाम भोर तालुक्यातील गटाच्या आरक्षणमध्ये किंचित फेरबदलाची शक्यता आहे. कदाचित कोणत्याही गटात महिलांना आरक्षण मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुक पुरुषांच्या घरातील महिला उमेदवार असतील. मात्र, गणातील आरक्षण कायम राहिले असल्याने त्यातील इच्छुकांना धोका नाही. गटाची नव्याने सोडत काढली जाणार असून भोरमधील गटात 98 टक्के बदल होणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, गटातील आरक्षण सोडतीमध्ये काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.
यामुळे नेमकं कोणत्या गटात महिलांना संधी मिळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे. जिल्हा परिषद गटात कोणत्याही ठिकाणी महिला आरक्षण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. यामुळे सर्व पक्षातील ठरलेले प्रस्थापित पुरुष उमेदवारांऐवजी त्यांच्या पत्नी अथवा घरातील अन्य महिला उमेदवार म्हणून पुढे येतील. भोर तालुक्यात सहावरून नव्याने आठ गणांची रचना झाली असून महामार्ग पट्ट्यातील वेळू, नसरापूर, संगमनेर, भोंगवली गणांतील इच्छुक उमेदवारांना धोका नसल्याने त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे कानमंत्र नेतेमंडळी देत असल्याचे चित्र आहे.
तीच परिस्थिती भोलावाडे, कारी, उत्रोली, शिंद गणात आहे. तालुक्यातील पंचायत समितीचे गण कायम असल्याने इच्छुकांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. वेळू – नसरापूर व संगमनेर ड्ढ भोंगवली व अन्य गटातील सर्वच पक्षातील पुरुष इच्छुकांनी जरी रणशिंग फुंकले असले तरी नव्याने गटाची पुन्हा सोडत होणार असल्याने सध्या ते सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्व राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी 'आमचाच नेता रणांगणात पॉवरफुल्ल, आमचाच विजय, कोरोना काळातील केलेले मदतीचा ऊहापोह, अशा अन्य प्रकारचे व्हिडीओ, संदेशाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र, गटाची आरक्षण सोडत बदल होणार असून नेमके कोणत्या गटात आरक्षण बदल होईल याचा अंदाज येत नसल्याने याबाबत सजग समर्थक शमले असल्याचे चित्र आहे.