भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: आठ वर्षांपुर्वी 30 जुलै 2014 रोजी घडलेल्या घटनेततून अद्यापही माळीणवासीय मनाने सावरलेले नाहीत. अचानक ढिगा-याखाली गेलेले सबंध गाव, क्षणार्धात 151 जणांचे मृत्यू व मागेे उरलेल्यांच्या मनावरील खोल जखमा अद्यापही ताज्या आहेत. मात्र, वाईट गोष्ट म्हणजे पुनर्वसन झालेल्या गावातील समस्याही त्रासदायक ठरत आहेत. काळ ठरलेल्या त्या रात्री पडलेल्या पावसामूळे साचलेले पाणी डोंगरातील भेगांत साठून कडाच कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढ्याने माणसेच काय, झाडांचीही दैना उडवली. डोंगरावरील झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. सावरण्याची संधीही न मिळता काही सेकंदातच संपूर्ण गाव ढिगा-याखाली गाडले गेले. ढिगा-याने क्षणार्धात 151 जिवांचा बळी घेतला.
दुर्घटनेतून वाचलेल्या 16 अंशत: बाधित कुटूंबाचेही प्रचंड हाल झाले. मात्र यांनाही नवीन गावठाणात घरे मिळाली, परंतु मोठा पाऊस पडला की अंगावर तर्रकन काटा येऊन जुन्या आठवणी ताज्या होतात. मात्र, नवीन गावठाणातही लोकांच्या पदरातील उपेक्षा संपूर्ण मिटलेली नाही. नवीन माळीण गावठाणातील काही घरांचे मीटर काढले आहेत. रीडिंगही घेतली जात नाहीत, ज्यांंचे मीटर राहिलेत त्यांना भरमसाठ वीजबिले दिली जात आहेत. मीटर काढलेल्या घरात अंधार आहे. वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले गेले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पुनर्वसन गावठाण ठिकाणी असणारे तलाठी कार्यालय नेहमी बंद असते. आरोग्य उपकेंद्रातही सध्या 108 रुग्णवाहिका व डॉक्टर असतात, परंतु नेमणूक असणारे कर्मचारी हे फक्त लसीकरणाच्या दिवशीच येतात. बाकी वेळी उपकेंद्र नेहमीच बंद असते.
अशातच ग्रामपंचायत कार्यालयही व्यवस्थित, वेळेवर कामकाज करत नसल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यंदा झालेल्या पावसात मात्र कुठेही जमीन खचली नाही अथवा पाणी तुंबले नाही. माळीण एकदम सुस्थितीत राहिले आहे. शासनाकडून मतृांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे 8.50 लक्ष रुपये दिले. विविध योजनांमधून मदतही केली. दुर्घटना घडल्यानंतर बरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर शेड उभारून तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. कायमस्वरूपी पुनर्वसन एक वर्षात करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागली.
विविध संस्थांची मदतही सरसावली
माळीण दुर्घटनेत 44 कुटूंबातील 151 लोक ढिगा-याखाली सापडून मृत झाले. यातील 9 लोक जखमी अवस्थेत सापडले तर 39 लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगा-याचे खोदकाम करून 151 मृतदेह बाहेर काढले. या आठ दिवसांत विविध नेत्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. अनेक सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, कंपन्या माळीणला मदतीसाठी पुढे आल्या. विविध संस्था व लोकांनी तहान-भूक विसरून पडेल ते काम येथे केले.
वारंवार तक्रारीनंतरही समस्यांकडे दुर्लक्ष
नवीन पुनर्वसित गावात दुर्घटनाग्रस्तांना जागा दिली आहे. काही सोयी निश्चितच आहेत, मात्र समस्यांही आहेत. अनेक घरांचे वीजमीटर काढले आहेत. काहींना भरमसाठ बिले दिली आहेत. वीज मीटर काढलेल्या घरात अंधार आहे. वारंवार लेखी व तोंडी तक्रार प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना करूनही लक्ष दिले गेले नसल्याचे सीताबाई भिवा विरणक यांनी सांगितले.