भीमाशंकर मंदिर व पवित्र शिवलिंग. दुसर्‍या छायाचित्रात दर्शनरांगेतील भाविक. (छाया : अशोक शेंगाळे) 
पुणे

भीमाशंकर : दोन लाख भाविकांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन

अमृता चौगुले

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग. पहिल्या श्रावणी सोमवारी येथे सुमारे दोन लाख भाविकभक्तांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. 'हर हर महादेव', 'डाकिण्या भीमाशंकर की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. शनिवारी व रविवारी दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर लोटला होता. मुखदर्शनाचीही सोय उपलब्ध असल्याने दर्शन सुलभ झाले. अधूनमधून येणार्‍या श्रावणसरी, उन्हं व धुके असे वातावरण होते. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस विशेष लक्ष ठेवून होते. दर्शनरांग एमटीडीसी ते मंदिर अशी 1 किमी अंतरावर होती. शिडीघाट व बैलघाट खांडसमार्गे पायी भाविक येत होते.

या वर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच मंगलमय वातावरणात यात्रा भरली आहे. पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले गेले. यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत एसटी महामंडळाच्या मोठ्या व मिनीबस ठेवण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी खेड व आंबेगाव पोलिस ठाण्यासह 228 पोलिस कर्मचारी, 80 होमगार्ड, 28 अधिकारी, जुन्नर व खेड उपविभागीय पोलिस अधिकारी होते.

वन्यजीव विभागाचे 30 कर्मचारी टोल नाका ते मंदिर परिसरात कचरा व प्लास्टिकवापरास बंदीबाबत जनजागृती व जंगलातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. मंदिर परिसर व पायर्‍या स्वच्छतेसाठी स्वकाम सेवा मंडळ आळंदीचे 35 स्वयंसेवक काम करीत होते. हुल्लडबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच बाँबशोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व सुरुवातीला वॉचटॉवर, डॉग स्क्वॉड, हँड मेटलडिटेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा व मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मानसिंह खोचे व घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT