पुणे

भीमाशंकर :गाळमिश्रित पाणी साचते मंदिर परिसरात ! मंदिरातही गळती

अमृता चौगुले

अशोक शेंगाळे : 
भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाशिवरात्र व श्रावण यात्रा या काळात देशातील कानाकोपर्‍यातून लाखो भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात. येथे आल्यानंतर सुविधांचा अभाव आहे. मंदिर परिसरात व पायर्‍याजवळ दुकांनाची गर्दी असल्याने भाविकांना जा-ये करणे अवघड होतंय, तर पायर्‍यावरून येणारे गाळमिश्रित पाणी मंदिर परिसरात साचते आणि संपूर्ण मंदिरास गळती असल्याने सर्वत्र ओलाचिंब परिसर दिसतो आहे.

भीमाशंकरच्या मंदिराकडे बसस्थानकाकडून पायर्‍यांवरून धोकादायक पद्धतीने असलेले निवाराशेड ठिकठिकाणी गळत आहेत. या धोकादायक शेडखालून जावे लागत आहे. यातच मंदिर परिसरात व पायर्‍याजवळ देवस्थान कर्मचारी यांनीच अतिक्रमण करत पायर्‍यावर दुकाने थाटली आहेत. यामुळे दुकांनाची गर्दी असल्याने भाविकांना जा-ये करणे अवघड होतंय, तर पार्‍यावरून येणारे पाणी गाळमिश्रित मंदिर परिसरात साचते. विकास आराखड्यातील कामे अपूर्ण अवस्थेत राहिल्याने अनेक समस्या सध्या भेडसावत आहेत.

यात मंदिर परिसरात भीमा नदीपात्रात येथील रहिवासी लोकांच्या शौचालय व मोरीचे पाणी जात असल्याने येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. मंदिर परिसरात घाण व दुर्गंधीमुळे भाविक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच मंदिराची पुरातत्त्व विभागाने दुरुस्ती केल्याने पावसात दगडी खांब व कळसालाही गळती लागली आहे. यातच पायऱ्यावरील पावसाचे गाळमिश्रित सांडपाणी मंदिर परिसरात येऊन डबके तयार होत आहे. या डबक्यातूनच भाविकांना मंदिरात प्रवेश करवा लागत आहे. यात भाविक मोठ्या श्रद्धेने येथे आल्यानंतर त्यांची निराशा होते. सोबतच भाविकांना लुटमार आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो. कधी अभिषेकाच्या नावे, तर दर्शनरांगेत जाण्यासाठी पैसे घेऊन लुटमार होत असल्याची खंत व्यक्त केली जाते आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही
मंदिर परिसर व दर्शन रांगेत शौचालय व पिण्याचे पाणीही नाही. बेल-फुले यांचेही जादा पैसे घेतले जातात. इतर तीर्थक्षेत्रासारख्या मूलभूत सविधांचा येथे मात्र अभाव आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सहावे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे येणारे भक्त-भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने येत आहेत.

SCROLL FOR NEXT