पुणे

भाविकांचा 40 कि.मी.चा वाचला वळसा

अमृता चौगुले

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: पुणे – पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे – निरा दरम्यानचे पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे मागील दोन दिवस चाललेले काम शनिवारी (दि. 9) सायंकाळी पूर्ण झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी जाणार्या भाविकांचा तब्बल 40 किलोमीटरचा वळसा वाचला आहे. पुणे – मिरज लोहमार्गावरील वाल्हे – निरा दरम्यान पिसुर्टी येथे असलेल्या रेल्वे फाटकानजिकच्या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे व दुपदरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून करण्यात येत होते. त्यामुळे पुणे – पंढरपूर या पालखी महामार्गावरील वाहतूक जेजुरी – मोरगाव – निरा अशी वळविण्यात आली होती.

दोन दिवस हे काम सुरू असल्याने पंढरपूरला आषाढीसाठी जाणार्‍या भाविकांना चाळीस किलोमीटरचा वळसा मारावा लागत होता. यामुळे प्रवासी, भाविकांचे हाल झाले. त्यामुळे रेल्वे विभागाकडून युद्धपातळीवर शनिवार (दि.9) सायंकाळी काम पूर्ण करण्यात आले. ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. परिणामी, पंढरपूरला जाणार्‍या भाविकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच मार्गाने पंढरपूरकडे जाणार होते. मात्र, हडपसर येथे आल्यावर पोलिसांनी सतर्कता बाळगत मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा थेट सोलापूर रोडने पुढे मार्गस्थ केला. एरवी दरवर्षी मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा हा हडपसर, दिवेघाट, सासवड, जेजुरी, वाल्हे, निरा, लोणंद, फलटण मार्गे होत असतो. मात्र, शनिवारी सायंकाळी काम झाल्याने रात्री उशिरा जाणारा मुख्यमंत्र्यांचा ताफा हडपसर, शेवाळवाडी, लोणी, यवत, चौफुला, पाटस मार्गे गेला.

अपघातांची शक्यता
मागील दोन दिवसांपासून पालखी महामार्गावरील रेल्वे फटकाचे काम सुरू होते. दरम्यान, या ठिकाणी एका बाजूस राडारोडा असल्याने व हलका पाऊस पडत असल्याने या पालखी महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पिसुर्टी गावाच्या जवळ पालखी महामार्गालगत रेल्वे प्रशासनाकडून संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. या दरम्यानचा रस्ता अरूंद असतानाच, पालखी सोहळा मार्गस्थ होण्यासाठी मुरूम भरून रस्ता रूंद करण्यात आला होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसाने पूर्ण रस्त्यावर चिखल झाला असून, दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT