पुणे

बोपदेव घाटात दाम्पत्याला लुटले; डोक्यात तलवारीने वार करून दागिने हिसकावले

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दुचाकीस्वार दाम्पत्याला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. चोरट्यांनी दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार केले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 60 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी बाळू बबन जाधव (वय 42, रा. कात्रज) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव मूळचे सासवडचे आहेत. ते शहरात नोकरी करत असून त्यांनी कात्रज भागात सदनिका भाडेतत्वावर घेतली होती. जाधव दाम्पत्य दुचाकीवरून सासवडला जात होते. रात्री साडेदहाच्या सुमारास के. जे. महाविद्यालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जाधव दाम्पत्याला अडवले आणि त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना तलवारीचा धाक दाखविला.

जाधव यांच्या डोक्यात तलवारीने वार करून त्यांचा मोबाइल हिसकावला. त्यानंतर जाधव यांच्या पत्नीला धमकावून चोरट्यांनी 60 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. चोरटे अंधारात पसार झाले. जाधव दाम्पत्याने घाटातून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना या घटनेची माहिती दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT