बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: वापराविना बंद पडलेले बेल्हे (ता. जुन्नर) येथील शासकीय गोडाऊन आता अखेरच्या घटका मोजत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने गोडाऊनची दुरुस्ती करून ही इमारत शासकीय कामासाठी वापरात आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बेल्हे येथे महसूल विभागाच्या मालकीचे तीस बाय पन्नास मीटर चौरस लांबीचे गोडाऊन उभे आहे. साठ वर्षांपूर्वी उभारलेल्या या गोडाऊनचा वापर सध्या होत नसल्याने गोडाऊनच्या पर्त्यांसह अॅगल गंजले आहेत. गोडाऊनची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
बेल्हे गावातून जाणार्या अहमदनगर-कल्याण महामार्गालगत बाजार आवारात हे शासकीय गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या जागेवर व्यापारी संकुल उभे करून उत्पन्न वाढविण्यासाठी गोडाऊनची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने द्यावी, यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बेल्हे ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत आहे. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने एकाही संस्थेला अद्याप ताबा दिला नाही. महसूल विभागाने बेल्हे येथील शासकीय गोडाऊनच्या इमारतीची दुरुस्ती अथवा येथे प्रशासकीय इमारत बांधावी. इमारतीच्या तळमजल्यावर व्यापारी संकुल निर्माण केल्यास व्यापाराला चालना मिळेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.