पुणे

बेल्ह्यात खताचे दुकान फोडले; 2 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरीस

अमृता चौगुले

बेल्ह; पुढारी वृत्तसेवा: बेल्हे गावालगतचे खताचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 22) पहाटे घडला. याबाबत रमेश बापुराजे पिंगट यांंनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बेल्हे बाह्यवळणावरील चौकात कायम गजबज असते. तेथील कृषी वैभव अ‍ॅग्रो सर्व्हिस दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी महागडी खते, औषधे, बियाणे, रोकड तसेच सीसीटीव्ही कॅमेरा असा ऐवज लंपास केला. दुकानातील कपाटे उचकटून त्यातील कागदपत्रे, जीएसटी बिले फाडून टाकली.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी याच दुकानात चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्या वेळी तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. या वेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर लंपास केला. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, पिंगट यांच्या खताच्या दुकानातील 2 लाख 62 हजार रुपयांचा ऐवजाची चोरी झाल्याची माहिती त्यांनी दिली. तपास सहाय्यक फौजदार भोसले करीत आहेत.

SCROLL FOR NEXT