बेल्हे : पुढारी वृत्तसेवा: बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी-वैद्यकीय अधिकारी यांची जागा रिक्त असल्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर मोठा भार पडत आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकार्यांची आवश्यकता असतानाही एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. बेल्हे येथे 1936 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. ही सर्वात जुनी पीएचसी असल्याने तिला 'मदर पीएचसी' संबोधले जाते. येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्तीस होते.
मात्र, येथे सन 1997 सालापासून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या नळावणे, पेमदरा उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे याठिकाणी उपकेंद्र असून नसल्यासारखे आहे. अहमदनगर- पुणे सरहद्दीवर असलेल्या बेल्हे प्राथमिक आरोग्य उपचारासाठी येणार्या रुग्णाला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. परिसरात आजारी व्यक्तीला 12 कि.मी. अंतर जाऊन बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याशिवाय पर्याय नसतो.
प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पंचवीस हजार लोकसंख्या तसेच दहा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या बेल्हे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी नियुक्त असल्याने रुग्णांची खूपच गैरसोय होते. त्याचप्रमाणे आरोग्य सेविकेची, आरोग्य सेवकांची जागा रिक्त आहे. सध्या येथे एकच आरोग्य सेविका कार्यरत आहे. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे वारंवार अपघात घडतात. अशा वेळी एक वैद्यकीय अधिकारी आणि तुटपुंज्या कर्मचारी वर्गाची खूपच तारांबळ उडते. या आरोग्य केंद्रातील रिक्त जागा लवकर भरून कर्मचार्यांची तसेच रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.