पुणे

बूस्टर डोसबाबत उदासीनता; चार लाख नागरिकांचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यावरही अद्याप 3 लाख 85 हजार 477 जणांनी बूस्टर डोस घेतलेला नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर निर्माण होणार्‍या अँटीबॉडीज सहा महिने ते नऊ महिन्यांपर्यंत टिकतात, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच शरीरात कोरोनाविरोधात पुन्हा प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, यासाठी बूस्टर डोसचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पुणेकरांना लसीकरणाचे गांभीर्य कळेनासे झाले आहे.

केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला. दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रांवर घेता येत आहे. मात्र, बूस्टर डोसची तारीख उलटूनही अनेक नागरिक निष्काळजीपणा करताना दिसत आहेत. शहरातील तब्बल 38 लाख लोकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे. त्यापैकी 32 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरात 5 लाख 24 हजार 106 जणांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.

मुलांचे लसीकरणही संथ गतीने
मुलांच्या लसीकरणालाही पालकांकडून संथ प्रतिसाद मिळत आहे. केवळ 28 टक्के मुलांनी कॉर्बेव्हॅक्स लसीचा पहिला, तर 15 टक्के मुलांचा दुसरा डोस झाला आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटांतील 31 हजार 883 जणांचा पहिला डोस, तर 19 हजार 647 जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. त्याचप्रमाणे, 15 ते 18 वर्षे वयोगटातील 1 लाख 17 हजार तरुणांनी पहिला, तर 77 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शाळा सुरू झाल्याने मुलांच्या आरोग्याचा विचार करून लसीकरणाला पालकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

लसीकरणासाठी जनजागृती
शहरात 38 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस आणि बूस्टर डोस घेणे बाकी असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या सांख्यिकी विभागाकडून एसएमएस पाठवले जात आहेत. तब्बल 10 लाख नागरिकांना एसएमएस पाठवण्यात आले आहेत. 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत जून महिन्यात 15 हजार जणांना लस देण्यात आले आहे.

                     – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

लस घेतल्यावरही कोरोना होणार नाही, याची शाश्वती नाही. लसीकरण झाल्यावरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असतेच; तो संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो. सध्या सौम्य लक्षणेच दिसत असताना बूस्टर डोस का घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. 18 ते 59 या वयोगटाला खासगी केंद्रांवर जाऊन लस घ्यावी लागत आहे. शासनाने या वयोगटासाठीही मोफत लस उपलब्ध करून द्यावी.

अनुजा पवार, नागरिक, शिवणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT