बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: 'एकेकाळी संपूर्ण देशामध्ये राजकीय वातावरण दलित पँथरने ढवळून काढले होते. अशा पँथरच्या डरकाळीची आजही मोठी गरज आहे,' असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. भारतीय दलित पँथर या संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव घाडगे आणि लता घाडगे या दाम्पत्याचा 'कट्टर पँथर' हा पुरस्कार केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आठवले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ दलित साहित्यिक अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बसवराज गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे आदी उपस्थित होते. 'दलित पँथर संघटनेचे दलित चळवळीच्या दृढीकरणात मोठे योगदान राहिले आहे. आज पँथरच्या डरकळीची गरज आहे, कारण दलित समाज विखुरलेला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी दलितांच्या चळवळीची धार कायम राहण्यासाठी पँथरच्या कार्यकर्त्यांची डरकाळीची अत्यावश्यक आहे, असेही आठवले यांनी सांगितले.