बावडा : पुढारी वृत्तसेवा: बावडा व परिसरातील गावांमध्ये शनिवारी (दि. 9) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे गेले तीन-चार दिवस झाले नागरिकांना सूर्यदर्शन होऊ शकले नाही. बावडा परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यानंतरही पावसाची रिमझिम व काही वेळा मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार चालूच आहे. पाऊस ऊस व इतर सर्व उभ्या पिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
अनेक शेतकर्यांनी खरीप हंगामामधील मका व इतर पिकांची पेरणी केली आहे. या पिकांच्या वाढीसाठी पाऊस उपयुक्त ठरला आहे. पावसामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे, अशी माहिती प्रगतशील शेतकरी राजकुमार जाधव (सराफवाडी), रमेश काकडे (बावडा), राहुल कांबळे (खोरोची) यांनी दिली. भूजल पातळी वाढण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे, असे शेतकरी सिध्दार्थ पाटील (बावडा), प्रसाद देवकर (रेडा) यांनी नमूद केले.