पुणे

बारामतीतील खंडोबानगरमध्ये महिलांना बेदम मारहाण

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील खंडोबानगर भागातील भोई गल्ली येथे वराह पालन करणारांकडून महिलांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वराह पालनावरून परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत होता. त्यावरून येथील नागरिकांनी नगरपरिषदेमध्ये तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून वराह पालन करणारांनी महिलांना बेदम मारहाण केली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटात यासंबंधी बैठक सुरु असताना त्यात वाद झाला. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला.

समाजमाध्यमावर महिलांना झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. महिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून सचिन हरीश्चंद्र पवार, बापू नाना पवार, प्रशांत हरिश्चंद्र पवार, अजय सुरेश पवार, लाला गणपत पवार, गणेश काळे, भुऱ्या राजू पवार, लक्ष्मी लाला पवार, वैशाली पोपट पवार यांच्याविरोधात बेकायदा जमाव जमवणे, मारहाण करणे, महिलांचा विनयभंग करत जबरदस्तीने मोबाईल चोरून नेणे, अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद मारहाण करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. उपनिरीक्षक गणेश पाटील तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT