बारामती; पुढारी वृत्तसेवा: वडगाव निंबाळकर येथील अरविंद साहेबराव यादव यांचे दुकान व घर बारामती सहकारी बँकेने कर्ज थकल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये ताब्यात घेतले होते. शेतकरी संघटनेला याची माहिती मिळताच संघटनेच्या पदाधिकार्यांनी ही मालमत्ता खुली केली आहे. यादव यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. नोटबंदी व कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला. परिणामी त्यांच्याकडून वेळेत कर्जफेड झाली नाही. थकबाकीमुळे बँकेने त्यांचे दुकान व घर ही मालमत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर गेली एक महिना यादव हे नातेवाईक, मित्र यांच्या घरी राहत होते.
या प्रकाराची माहिती शेतकरी संघटनेला मिळाली. त्यानंतर शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष हनुमंत वीर, बारामती तालुकाध्यक्ष किरण मदने, इंदापूर तालुका अध्यक्ष हरिदास पवार, युवा आघाडीचे दादा किरकत, सचिन कोथिंमिरे, श्रीकांत गावडे, शशिकांत आरडे आदी कार्यकर्त्यांनी यादव कुटुंबीयांचे कुलूप लावलेले घर व दुकानाचा ताबा घेत ते खुले केले.
पोलिसांत तक्रार दाखल
संबंधित कर्जदाराने कर्ज थकवल्याने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने दुकान व घर सील केले होते. काही लोकांनी ते खुले केल्याची माहिती मिळाली. बँकेकडून यासंबंधी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी, यासाठी पत्र देण्यात आल्याचे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.
वडगावमधील घटनेसंबंधी पोलिस ठाण्यात बँकेकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. कायद्यानुसार, त्यावर कार्यवाही केली जाईल.
– सोमनाथ लांडे, सहायक पोलिस निरीक्षक