पुणे

बारामतीत पवार घराण्याला घेरण्याची भाजपची रणनीती; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन दौर्‍यावर

अमृता चौगुले

राजेंद्र गलांडे
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 2024 च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याची तयारी सध्या भाजपकडून सुरू आहे. 2014 आणि गत 2019 च्या निवडणुकीत भाजपने येथे सुळे यांच्याशी चांगली लढत दिल्याने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने आतापासूनच 2024 ची तयारी सुरू केली आहे.

2019 ला सुळे 1 लाख 55 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या, तर 2014 ला त्यांना अवघे 70 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या दोन्ही निवडणुकांत सुळे यांना विजयासाठी फार लढावे लागले होते. 'बारामती पवारांची' या समीकरणाला यामुळे प्रथमच धक्का बसला. गावोगावच्या स्थानिक नेत्यांपर्यंत संपर्क साधून आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना स्वत: तळ ठोकून विजय खेचून आणावा लागला होता.

2019 च्या निवडणुकीत बारामती, इंदापूर या दोन तालुक्यांचा सुळे यांच्या विजयात मोठा वाटा होता. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून या दोन तालुक्यांत कमालीची ताकद लावली जात आहे. अख्ख्या पवार घराण्याला त्यांच्या घरच्याच मतदारसंघात घेरून निवडणुकीत येथेच व्यस्त ठेवण्यासह विजयाची ही व्यूहरचना भाजप करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदारसंघाच्या दौर्‍यावर येत आहेत.

2014 साली राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी मोदी लाटेत बारामतीत पवारांना घाम फोडला होता. त्या वेळी खासदार सुळे यांना 70 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवता आला होता. बारामतीतच त्यांना 90 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. सुळे यांना लोकसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 22 हजार 562 मते मिळाली होती, तर जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मते मिळाली होती. त्यात बारामती विधानसभा क्षेत्रातून सुळे यांना 1 लाख 42 लाख 628, तर जानकर 52 हजार मते मिळाली होती. येथील 90 हजारांच्या मताधिक्याने सुळे यांचा विजय सुकर झाला होता.

2019 साली ऐनवेळी भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना रिंगणात उतरविले. भाजप-सेनेची सत्ता त्यावे ळी राज्यात होती. परिणामी, भाजपकडून प्रचंड ताकद लावण्यात आली. परंतु, एकट्या बारामती तालुक्याने 1 लाख 28 हजारांचे, तर इंदापूर तालुक्याने 70 हजारांचे मताधिक्य सुळे यांना दिले. पुरंदर, भोरमध्येही त्यांना कुल यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. परिणामी, त्या 1 लाख 55 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील परिस्थिती बदलली आहे. बारामतीत भाजपने स्वतःचे कार्यालय सुरू केले. भाजप-सेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांनी बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. पाटील यांनी बारामती मतदारसंघात तळ ठोकला होता. फडणवीस यांचेही बारकाईने लक्ष होते. तरीही 2019 च्या निवडणुकीत भाजप विजयापासून दूर राहिला. अर्थात, त्याला बारामती व इंदापूर तालुक्याने दिलेले मताधिक्य कारणीभूत ठरले.

भाजपकडून आता 2024 च्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. मतदारसंघातील धनगर समाजाची मते लक्षात घेत येथील प्रभारीपदाची जबाबदारी माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी नुकताच मतदारसंघाचा दौरा करीत 'ए' फॉर 'अमेठी'नंतर आता 'बी' फॉर 'बारामती'कडे आम्ही लक्ष देणार असल्याची घोषणा केली आहे. 2024 साली कोणत्याही परिस्थितीत येथे भाजपचा खासदार होणार असल्याचे सांगितले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मतदारसंघाचा दौरा करीत आहेत, त्यापाठोपाठ सीतारामन यांचा दौरा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा वेळ आहे. परंतु, भाजपने फार आधीपासूनच तयारी हाती घेतली आहे. लोकसभेचा उमेदवार लवकर ठरवून कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे भाजपने सांगितले. मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राचा विचार करता राष्ट्रवादीची मदार आता फक्त बारामतीवरच आहे.

दौंड (राहुल कुल), खडकवासला (भीमराव तापकीर) असे भाजपचे आमदार आहेत, तर इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुरंदरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे दोन प्रबळ नेते भाजपकडे आहेत. भोरमध्येही शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपची ताकद वाढलेली आहे.

इंदापूरला राष्ट्रवादीचे आमदार आहेत. परंतु, गत निवडणुकीत सुळे यांच्यासोबत असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आता भाजपमध्ये आहेत. अन्य विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 2024 ची निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नसेल. बारामतीपुरता विचार करायचा झाला, तर सुमारे 98 टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.

माळेगाव, सोमेश्वर कारखाना ताब्यात आहे. अन्य सहकारी संस्थांवर एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे सुळे या बारामतीपुरत्या निर्धास्त आहेत. बारामतीत राष्ट्रवादीचे गावोगावी मजबूत संघटन आहे. त्याचा फायदा सुळे यांना नेहमीच होत आला आहे. आता भाजपचे केंद्रीय व राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी त्यात कितपत बदल घडवतील, हे येणार्‍या काळात कळेल.

SCROLL FOR NEXT