बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील भिगवण चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील नागरिकांना आणि शहराबाहेरून येणार्या प्रवाशांना याचा त्रास होत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
बारामती शहर पोलिसांनी रस्त्यावर पार्किंग करणार्या वाहनांवर कारवाई केली, सम – विषम संख्येनुसार वाहने लावण्यास सुरुवात करूनही वाहतूक कोंडीत कोणताही बदल होत नसल्याने चित्र आहे. सोमवारीही (दि.11) हेच चित्र दिसून आले. वाहनचालकांना आणि रस्त्यावर वाहन पार्किंग करणार्यांना कोणत्याही प्रकारची शिस्त नसल्याने शहरातील मुख्य चौकांचा श्वास गुदमरला आहे. भिगवण चौक ते इंदापूर चौक, इंदापूर चौक ते गुणवडी चौक, भिगवण चौक ते गांधी चौक आणि तीन हत्ती चौकात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत आहे.
सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सकाळच्या सत्रात रस्त्यावर मोठी गर्दी होती. त्यातच शाळा- महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. संततधार पावसामुळे अगोदरच दमछाक झालेल्या नागरिकांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एकीकडे पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असताना स्थानिक व्यावसायिक, नागरिकांनी आणि प्रवाशांनी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, ते होताना दिसत नाही.
जडवाहनांसाठी रिंगरोड असतानाही अनेक वाहने बिनधास्त शहरातून प्रवास करतात. याला आळा घालणे गरजेचे आहे, अन्यथा मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार आहे. शहरात जागा मिळेल तिथे अस्ताव्यस्त पार्किंग केलेली वाहने, पार्किंगसाठी अपुरी जागा, वारंवार वाहतूक कोंडी, नियमांचे पालन न करता धावणारी वाहने, विनाकागदपत्रे आणि परवान्याविना धावणारी वाहने आदी कारणांमुळे बारामती वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडली आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.