पुणे

बारामती शहरात गणरायाचे मोठ्या थाटात आगमन

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया'च्या जयघोषात बुधवारी (दि. 31) बारामतीत सार्वजनिक व घरगुती गणरायांचे आगमन झाले. सार्वजनिक मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना केली. ताशांच्या तालावर गणराय घरोघरी येत विराजमान झाले. कोरोनाचे सावट यंदा उत्सवावर नसल्याने भाविकांचा उत्साह दिसून आला. बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली.
गणेश चतुर्थीदिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी मंगळवारीच श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवण्यात आल्या होत्या.

गणेश प्रतिष्ठापनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत उत्साही वातावरण होते. मूर्तीसह हार, फुले, दूर्वा, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, मकर, लाईटच्या माळा, फटाके यांची मोठी विक्री झाली. बुधवारी सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग दिसून आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत गणरायाला घरी आणण्यात आले. गणेश मूर्तींची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन पार पडले. आरती करण्यात आली. उकडीच्या मोदकांचा नैवैद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. तरुणांसह बालचमूंचा उत्साह गणेशोत्सवामुळे शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

शहरात चौकाचौकात मंडळांनी मंडपात आकर्षक सजावट केली आहे. वैविध्यपूर्ण मंदिरासह सिहासनाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मोठ्या मंडळांकडून गणेशोत्सवात दहा दिवस विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाली. मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर व अन्य मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. अखिल मंडई मंडळाच्या मानाच्या पहिल्या गणपतीची माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, नगरसेवक सत्यव्रत काळे आदींच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना झाली.

मंडळाचे अध्यक्ष नीलेश धालपे व इतर या वेळी उपस्थित होते. भोईगल्लीतील भोईराज तरुण मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक काढत बाप्पाला विराजमान केले. अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपतीची सुभाष सोमाणी, श्रीकांत सिकची, रवींद्र रणसिंग, अ‍ॅड. संदीप गुजर, अ‍ॅड. श्रीनिवास वायकर आदींच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. मंडळाचे अध्यक्ष सुनील लडकत, रमेश पंजाबी, निखिल लोंढे, चेतन जाधव, प्रेमराज गायकवाड आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT