पुणे

बारामती : लाकूडतोड करून कोळसा भट्ट्या सुरू

अमृता चौगुले

लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील वन हद्दीतील झाडे तोडून कोळसा भट्ट्या लावल्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांच्याकडे अनिल शिवाजी गुणवरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

गुणवरे हे दि. 30 मे रोजी बारामतीकडून जेजुरीकडे जात असताना लोणीपाटी हद्दीतील वनविभागानजीक लाकडे तोडून ट्रॅक्टर भरत असताना त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याचे फोटो काढले व ते वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कार्यालयात अर्जासोबत दिले; मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

त्यानंतर दि. 15 जून रोजी त्या ठिकाणी लाकडे, कोळसा भट्टी तयार करून टेम्पो भरून घेऊन जात होते. त्याचेही फोटो काढून वनपरिक्षेत्र अधिकारी व उपवन संरक्षक अधिकारी यांना पाठवले. माहिती अधिकारात माहिती मागवली. परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर संबंधित मोरगाव वनविभागाचे वनपाल ए. बी. पाचपुते व कर्मचारी यांना फोन करून संपर्क साधला असता व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत.

याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाली व त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांना अनेक वेळा भेटण्यास गेलो असता त्याही भेटल्या नाहीत. अनेकदा बैठकीला गेल्या आहेत, पुण्याला गेल्या आहेत असे सांगण्यात आले. या सर्व गोष्टींची चौकशी होऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, असे या अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना विचारले असता या ठिकाणी जुनी, जीर्ण झालेली व काटेरी झाडे काढून त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्याचे रीतसर काम चालू असून कुठलाही गैरप्रकार नसल्याचे सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT