बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या देवयानी रणजित पवार ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) जीनिव्हा येथील मुख्यालयात आयोजित केलेल्या प्रतिष्ठित ग्लोबल शेपर्स अॅन्युअल परिषदेत ग्रामीण भागाचे नेतृत्व करणार आहेत. स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे होणार्या 30 वर्षांहून कमी वयाच्या युवावर्गाच्या विभागात सहभागी होण्यासाठी देवयानी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती विभागामध्ये निवडून आलेल्या व क्युरेटर असलेल्या देवयानी ह्या युवा नेत्यांच्या या परिषदेत जागतिक व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
दरम्यान, जागतिक व्यासपीठावर तीस वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवावर्गाचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांसोबत काम करताना मला जे अनुभव आले, ते मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते.
या परिषदेत 'डब्ल्यूईएफ'चे संस्थापक क्लॉस श्वाब आणि ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या प्रमुख नताली पियर्स यांनी मांडलेले विचार माझ्या भविष्यातील प्रवासात महत्त्वपूर्ण ठरतील, असे देवयानी यांनी सांगितले. देवयानी यांनी कॉर्पोरेट कायद्याची पदवी संपादन केलेली असून, त्यांनी बीबीएचीही पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय जगप्रसिध्द लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी एमबीएची पदवी संपादन केली आहे.