पुणे

बारामती कृषी बाजार समिती विभागात अव्वल

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील बाजार समित्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर दिलेल्या क्रमवारीत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीस पुणे विभागात अव्वल, तर राज्यस्तरावर नववा क्रमांक प्राप्त झाला आहे. पणन संचालक सुनील पवार यांनी याबाबत माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची 2021 ते 2022 या वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांमधून क्रमवारी जाहीर केली गेली.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांपैकी कामगिरीच्या आधारावर राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रसिध्द केली जाते. यात यंदा बारामतीच्या बाजार समितीस पहिल्या दहात स्थान प्राप्त झाले आहे. पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या निर्देशानुसार शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठीच्या सुविधा, योजना व उपक्रम राबविण्यातील सहभागानुसार इतर विविध 35 निकषांनुसार ही क्रमवारी ठरते. पुणे विभागात बारामती, संगमनेर व अकलूज बाजार समितीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. समितीने आजवर नेहमीच शेतकरी अभिमुख निर्णय घेतले. शेतकर्‍यांसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विक्रीव्यवस्था उभारली, त्याचे हे फलित आहे.

                          अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती

SCROLL FOR NEXT