पुणे

बलात्काराच्या गुन्ह्याला 7 वर्षांनंतर वाचा; शाळेतील ‘गुड टच, बॅड टच’च्या समुपदेशनावेळी झाला प्रकार उघड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शाळेत 'गुड टच, बॅड टच'च्या अनुषंगाने समुपदेशनासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या चौकशीतून एका दहावीत शिकणार्‍या मुलीवर सात वर्षांपूर्वी म्हणजेच ती तिसरीत असताना एकाने घरी बोलावून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार
उघड झाला. तब्बल सात वर्षांनंतर बलात्काराच्या गुन्ह्याला वाचा फुटली आहे. याप्रकरणी 21 ते 22 वर्षांच्या मुलावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात 15 वर्षीय शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेत शिकण्यास आहे. त्याच शाळेत 'गुड टच, बॅड टच'च्या अनुषंगाने समुपदेशन सुरू असताना एका दहावीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीने आपली व्यथा समुपदेशनासाठी आलेल्या सामाजिक कार्यकत्र्यांपुढे मांडली.

तिने आपल्यावर झालेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल सांगितले की, 2015 मध्ये ती म्हणजे सात वर्षांपूर्वी इयत्ता तिसरीत शिकत असताना तिच्या तोंडओळखीच्या असलेल्या आरोपीने तिला त्याच्या घरात बोलावले होते. त्या वेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्याशी बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार केला. संबंधित समुपदेशकांना तिने हा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुस्कान संस्थेच्या माध्यमातून पीडित मुलीने उत्तमनगर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत फिर्याद दिली. संबंधित तरुणावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक लुगडे करीत आहेत.

पीडित मुलीच्या शाळेत समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा तिने समुपदेशकांना तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर मुस्कान संस्थेशी संपर्क साधून या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्या वेळी संशयित आरोपीही विधिसंघर्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

                        – सुनील जैतापूरकर, वरिष्ठ निरीक्षक, उत्तमनगर पोलिस ठाणे

SCROLL FOR NEXT