पुणे

फ्रेंडशिप बँड…पार्टी आणि भटकंतीही ! तरुणाईसह ज्येष्ठांकडूनही मैत्री दिन साजरा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाविद्यालयीन तरुणाईसह अनेक ज्येष्ठ मित्र -मैत्रिणींनी रविवारी (दि.7) एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधून मैत्री दिवस साजरा केला. रविवारी महाविद्यालयांना सुटी असतानादेखील शहरातील काही महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र जमत एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील प्रसिद्ध अशा महाविद्यालयांसह फर्ग्युसन रस्त्यावरदेखील तरुणाईची रविवारी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी तरुणाईने आपले मैत्रीचे संबंध आणखी दृढ व्हावेत, याकरिता एकमेकांना शुभेच्छा देत मैत्री दिनाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान, तरुणाईच्या गर्दीने शहरातील अनेक हॉटेल्स गजबजल्याचेदेखील पाहायला मिळाले. मैत्री दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्यानंतर तरुणाईने खाद्य पदार्थांवर ताव मारत पार्टी केली.

मैत्री दिनानिमित्ताने पर्यटनही…
फ्रेंडशिप डे निमित्त शहरातील तरुणाईने एकत्र येत शहरालगतच्या पर्यटन स्थळांवर गर्दी केली होती. सिंहगड, राजगड, तोरणा, मढे घाट, पुरंदर, महाबळेश्वर, सारसबाग, शनिवारवाडा यांसारख्या अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणाईचे ग्रुप पाहायला मिळाले. महाविद्यालयीन तरुणाईने मैत्री दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटनाचा बेत आखल्याचे रविवारी पाहायला मिळाले.

नोव्हेल्टीजच्या दुकानांत गर्दी
मैत्री दिनानिमित एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आजची तरुणाई हातातील फ्रेंडशिप बँड आणि ग्रिटिंग कार्ड एकमेकांना देत असते. शुभेच्छा पत्रे आणि बँड खरेदीसाठी तरुणाईने नोव्हेल्टीजच्या दुकानांत प्रचंड गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT