पुणे

फुलेवाडी ताजणेमळा चासवाट नांगरल्याने शेतकरी त्रस्त

अमृता चौगुले

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: येथील फुलेवाडी ते ताजणेमळा चासवाट रस्ता शेतकर्‍याने पेरणी करून बंद केला आहे. त्यामुळे वस्तीवरील नागरिकांचे दळणवळण तसेच शेतमाल बाजारपेठेत ने-आण बंद झाले आहे. परिणामी येथील 50 हून अधिक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मंचर पोलिसांनी याप्रकरणी फुलेवाडी येथील तुकाराम नथू घोडेकर व प्रकाश नथू घोडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार घोडेगाव व जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी यांनी रस्त्याबाबत दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याची फिर्याद प्रभाकर डोके यांनी दिली आहे. ताजनेमळा येथे ये-जा करण्यासाठी शेत जमीन गट नं. 2291 मधून 8 फूट रुंदीचा पूर्वापार वहिवाटीचा कच्चा रस्ता आहे.

तुकाराम नथू घोडेकर, प्रकाश नथू घोडेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी ऑक्टोबर 20 मध्ये रस्त्यावरून वहिवाट करण्यासाठी अडवणूक केली. जालिंदर लक्ष्मण ताजने, प्रभाकर दत्तात्रय डोके, सचिन मारुती बनकर व अन्य 27 जणांनी रस्त्याच्या वाहिवाटीसाठी तहसीलदार घोडेगाव यांच्याकडे अर्ज केला. त्या अनुषंगाने स्थळ पाहणी करून तहसीलदारांनी पूर्वीप्रमाणे वहिवाट करण्याची परवानगीचे आदेश दिले. त्यानंतर सदर निकाल मान्य नसल्याने लता निवृत्ती घोडेकर, चंद्रशेखर निवृत्ती घोडेकर, नंदा भरत घोडेकर व वर्षा प्रकाश घोडेकर यांनी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फेरतपासणी अर्ज केला. त्यांनी तपासणी करून तहसीलदारांचा आदेश कायम ठेवला.

त्यानुसार, जालिंदर ताजने, प्रभाकर डोके, सचिन बनकर व अन्य 27 जण रस्ता वहिवाटीसाठी वापरत होते. मात्र, दि. 20 जून 2022 रोजी दुपारी अडीच वाजता तुकाराम नथू घोडेकर, प्रकाश नथू घोडेकर यांनी गट नं. 2291 कडे जाणारा वहिवाटीचा कच्चा रस्ता ट्रॅक्टरने नांगरून टाकला. प्रभाकर डोके व अन्य जणांनी विचारणा केली असता त्यांना सदर रस्ता आमच्या मालकीचा असून, तुमचा या रस्त्याशी काहीही संबंध नाही, तुम्ही पुन्हा या रस्त्याने आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार विलास साबळे करत आहेत.

SCROLL FOR NEXT