पुणे

फळभाज्यांची आवक वाढली; भाव स्थिर ; मार्केट यार्डात 100 ट्रक शेतमाल दाखल

अमृता चौगुले

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक दहा ट्रकने वाढली. रविवारी तरकारी विभागात 100 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. आवक जावक कायम असल्याने सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून 3 ट्रक मटार, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 4 टेम्पो तोतापुरी कैरी व 2 टेम्पो घेवडा तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 10 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 6 हजार 500 ते 7 हजार क्रेटस, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, भुईमूग 100 गोणी, गाजर 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 90 ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा 45 ट्रक इतकी आवक झाली.

पालेभाज्यांच्या दरातील तेजी कायम

अतिउष्णतेमुळे पाण्याचा निर्माण झालेला तुटवडा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचलेले भाव कायम आहेत.

रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 4 ते 25 रुपये तर किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये इतके राहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT