पुणे

प्लास्टिकविरोधी कारवाई आता तीव्र; कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या घोषणेमुळे शहरात प्लास्टिक पिशवी बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यासाठी महापालिका सरसावली असून, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले आहेत. राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कारवाईमध्ये सातत्य नसल्याने शहरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री आणि वापर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

अशातच केंद्र सरकारनेच संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाईला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणाला मारक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी महापालिकेकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. नुकतेच पालखी सोहळ्यामध्ये देखील प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. एकदा कारवाई केल्यानंतर पुनरावृत्ती करणार्‍या विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे आदेश आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयस्तरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व आरोग्य निरीक्षकांमार्फत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची कारवाई करण्यात येत आहे. दररोज 20 ते 25 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या जात आहेत. प्रशासनाने यापूर्वी देखील शहरात प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती करणारे उद्योग आणि विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून शेकडो किलो प्लास्टिक पिशव्या जप्तही करण्यात आल्या आहेत.

             – आशा राऊत, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, महापालिका

SCROLL FOR NEXT