पुणे : पुढारी वृत्तसेवा: छापासत्रावरून देशभर प्राप्तिकर विभाग चर्चेत असताना त्याची वेबसाइटच स्लो झाल्याने पुन्हा चर्चेत आले आहे. वेळेवर विवरण भरणार्या ग्राहकांना विभागाच्या चुकीचा फटका बसतो आहे. सामान्य नोकरदारापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना वर्षभरात केलेल्या उलाढालीचा ताळेबंद 31 मार्चच्या आत प्राप्तिकर विभागाला सादर करावा लागतो. मात्र, त्यांना लेट फीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम भरावी लागत असल्याचे समोर आले आहे. 'भीक नको, पण कुत्रे आवर' या म्हणीप्रमाणे नागरिकही कटकट टाळण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटमार्फत विवरण सादर करतात. वेबसाइट अपडेट करण्याच्या नावाखाली हा विभाग एप्रिलपासून प्राप्तिकरदात्यांना त्रास देत असल्याचे दिसते.
विभागाच्या 26 एएसनुसार टीडीएस कापल्यानंतर त्या उद्योजकाने तो भरताच पोर्टलवर दिसणे गरजेचे असते. ते दिसले तरच क्लेम करता येऊ शकतो. वार्षिक विवरण दाखल करणार्यांना 30 लाखांच्या वरील मालमत्ता, शेअर्स, रोख 10 लाख, मुदत ठेव व त्यावर मिळणारे व्याज पोर्टलवर दिसणे गरजेचे आहे. असे असताना या विभागाची वेबसाइट मागील चार महिन्यांपासून स्लो आहे.
वार्षिक विवरण पत्र क्रमांक 5 दाखल केल्यावरही अपडेट दिसण्याएवजी 4 क्रमांकाचे पत्र पोर्टलवर दिसते आहे. आयटी विभागाचा सपोर्ट मिळत नसल्याने राज्यातील सीएदेखील अडचणीत आले आहेत. सीए संघटना अर्थमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याचे सीए दिलीप सातभाई व आर. बी. शर्मा यांनी सांगितले.
रिटर्न पोर्टलवर दिसेना; खातेदार -सीएमध्ये वाद!
अपडेटेड रिटर्न दाखल करण्यात अनेक अडचणी येत आहेत. शेअर बाजारात व्यवसाय करणार्यांची संख्या 50 लाखांवरून 10 कोटींवर गेली आहे. अशा ग्राहकांना दहा वर्षांत माफी देण्याच्या दृष्टीने दीडपट कर व 5 हजार दंड, अशी तरतूद करण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत पोर्टलवर अपडेट करण्यात न आल्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे. 199 (2) ब नुसार दहा वर्षांपर्यंत मुख्य आयुक्तांकडे रिफंडसाठी दाखल करता येते. मात्र, पोर्टलवर तांत्रिक त्रुटी दाखवत हे दावे अप्रत्यक्ष नाकारले जात आहेत. शिवाय, दाखल केलेले रिटर्न सी. पी. सी. बंगळुरूच्या पोर्टलवर दिसत नसल्याने खातेदार व सीएमध्ये वाद होताना दिसत आहे.
मागील चार महिन्यांपासून या विभागाची वेबसाइट अपडेट करण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक आयटीआर दाखल करूनही पोर्टलवर दिसत नाही. याचा भुर्दंड नागरिकांना बसून दंड भरण्याची वेळ येत आहे.
– दिलीप सातभाई, सीए