पुणे

‘प्रतिपंढरपूर’ला आज 250 पोलिस तैनात

अमृता चौगुले

सिंहगड रस्ता : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्त्यावरील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशीला दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे बंदोबस्तासाठी तब्बल 250 पोलिस राहणार आल्याची माहिती सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली. गेली दोन वर्षे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे यंदा गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेत पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. विठ्ठल मंदिरात सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी येतात.

आषाढी एकादशीला सकाळी सहापासून रात्री 11 पर्यंत विठ्ठलवाडी येथे दोन पोलिस उपायुक्त, पाच पोलिस निरीक्षक, 10 ते 12 पोलिस उपनिरीक्षक, यांच्यासह 250 पोलिस असणार आहेत. आषाढीच्या निमित्ताने राजाराम पुलापासून दोन्ही बाजूला दुचाकीच्या एका रांगेला पार्किंगची परवानगी देण्यात आली आहे. चारचाकी वाहनांना राजाराम पूल ते विठ्ठलवाडी दरम्यान असणार्‍या मोकळ्या जागेत, तसेच विठ्ठलवाडी चौकातील सेंट झेवियर महाविद्यालय व मोंटेरोझा सोसायटीच्या प्रांगणात पार्किंग करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या उदयसिंह शिंगाडे यांनी दिली.

प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी
सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने देखील आषाढीच्या पार्श्वभूमीवर तयारी करताना भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वैद्यकीय पथक देखील भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपलब्ध करून देणार असून, घनकचरा विभाग देखील जमा झालेला कचरा संकलन करण्यासाठी सज्ज राहणार असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी प्रदीप आव्हाड यांनी दिली.

SCROLL FOR NEXT