धायरी; पुढारी वृत्तसेवा: रात्रीच्या दहा वाजता घरातून अचानकपणे बाहेर पडलेल्या पंचाहत्तर वर्षांच्या आजी सिंहगड रोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांच्या ताब्यात सुखरूप परतल्या. पोलिसांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता व माणुसकी यातून समाजापुढे आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नर्हेगाव येथील अनारदेवी जगदीश पांडे (वय 75, रा. मुक्ताई अपार्टमेंट, गोकुळनगर) नर्हेगाव) या आजीबाई शनिवारी (दि.20) त्यांच्या राहत असलेल्या इमारतीच्या पायर्यांवर बसलेल्या होत्या. अचानकपणे त्या येथून निघून गेल्या होत्या. आजींना स्मृतिभ्रंश झाला असल्यामुळे त्या कोठे जात आहेत, याचे थोडेसुद्धा भान त्यांना राहिले नव्हते. त्या रात्रभर चालत होत्या.
दरम्यान सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर पडवळ, मनोज राऊत, चालक आर. एस. नदाफ रात्रीच्या गस्तीवर असताना या एकट्या आजी रविवारी पहाटे दोनच्या सुमारास धायरी फाटा उड्डाणपुलावरून चालत जात असताना दिसल्या. पडवळ यांनी लागलीच गाडी आजी जवळ घेऊन आजीची जिव्हाळ्याने विचारपूस केली आणि रात्रीच्या वेळी एकट्या कोठे चालले आहात, अशी विचारणा केली. मात्र, आजींना आपले नाव, पत्ता काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे त्यांना स्मृतिभ्रंश असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी आजींना गाडीत बसवून धायरी परिसरातील त्यांचे घर शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे घर व नातेवाईक कुठे आहेत, हे सापडले नाहीत.
त्यामुळे त्यांना लगेच अभिरूची पोलिस चौकीत आणले. दरम्यान चौकीत ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस सारिका सानप यांनी त्यांना चहा-बिस्कीट दिले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, शिवाभाऊ पासलकर व नागरिकांच्या मदतीने सोशल मीडियावर त्यांचा फोटो टाकून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला. त्यानंतर सकाळी दहा वाजता त्यांचा मुलगा आल्यानंतर सुखरूपपणे त्यांच्या ताब्यात दिले. यामुळे सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव व आजींच्या नातेवाइकांनी सिंहगड रस्ता पोलिसांचे अभिनंदन व कौतुक केले.