पुणे; पुढारी वृत्तसेवा: येरवडा कारागृहातून अभिवचन रजा मंजूर करून बाहेर आलेले दोन कैदी रजेचा कालावधी संपल्यानंतरही कारागृहात परतले नाहीत. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाहबाज ऊर्फ चिच्या सादिन (वय 52, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि गौरव राजकुमार शर्मा (रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक) अशी त्यांची नावे आहेत. कारागृहातील रक्षक संदीप भोसले यांनी या संदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बागवान याला लष्कर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला 45 दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर करण्यात आली होती. अभिवचन रजेचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परतला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा याला लष्कर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने एक वर्ष पाच महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
त्याला 45 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. रजेचा कालावधी संपल्यानंतर शर्मा कारगृहात न परतल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष खेतमाळस तपास करीत आहेत. येरवडा कारागृहातून अभिवचन रजेवर गेलेले सुमारे 20 ते 30 कैदी परतले नसल्याचे कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले.