सुवर्णा चव्हाण
पुणे : कोरोनामुळे छापील पुस्तकांकडे वाचकांचा ओढा वाढला. आता पुस्तक व्यवसायाची घडीही तशी रुळावर आली आहे. पुण्यात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत जवळपास 1200 पुस्तकांची निर्मिती झाली. परंतु, कागदांच्या किमती वाढल्यामुळे पुस्तकांच्या किमतीतही 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुस्तकांच्या नव्या आवृत्तीच्या प्रतींची संख्या प्रकाशकांनी यामुळे कमी केल्या असून, नव्या पुस्तकांच्या पानांची संख्या कमी करता येईल का, यावरही प्रकाशक विचार करताना दिसत आहेत. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर सध्या पुस्तकनिर्मिती होत आहे. पण, कागदाच्या किमती वाढल्याचा परिणाम पुस्तकनिर्मितीवरही झाला आहे.
प्रकाशकांना कागदाच्या किमती परवडणार्या नसल्याने पुस्तकांच्या किमतीतही वाढ झाली आहे. मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी म्हणाले, 'कागदाची किंमत आणि वाहतुकीचा खर्चही वाढल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे प्रकाशकांना मराठी पुस्तकांच्या किमती वाढवाव्या लागल्या असून, वाचकांमध्येही नाराजी आहे.' प्रकाशक चेतन कोळी म्हणाले, 'सध्या पुस्तकनिर्मिती होत आहे. पण, पुस्तकांच्या नव्या आवृत्तींच्या प्रती घटत आहेत. त्यामुळे पुस्तकांच्या खरेदीवरही परिणाम झाला असून, 1000 प्रती छापणारे प्रकाशक आता 500 प्रती छापत आहेत. नव्या पुस्तकांच्या पानांची संख्याही कमी करावी का? याचाही विचार प्रकाशक करीत आहेत.'
पूर्वीप्रमाणे प्रकाशक आता 1 ते 5 हजार अशा पुस्तकांच्या प्रती काढत नाहीत. मागणीप्रमाणे पुस्तकांच्या प्रती (प्रिंट ऑन डिमांड) अशी संकल्पना त्यांनी स्वीकारली आहे. 200 ते 250 प्रती मागणीप्रमाणे काढण्यात येत आहेत. भरपूर प्रती काढण्याची जोखीम प्रकाशक घेताना दिसत नाहीत. कोरोनामुळे आधीच नुकसान झाले आहे. त्यामुळे आता प्रकाशक जोखीम पत्कारायला तयारी नाहीत. प्रकाशक वाढले आहेत, व्हरायटी वाढली आहे, पण प्रतींची संख्या घटली आहे, असे प्रकाशक देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी सांगितले.
कोरोनामुळे पुस्तक व्यवसायाचे नुकसान झाले खरे, पण आता कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुस्तक निर्मिती वाढली आहे. प्रकाशकांकडून दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली जात असून, व्यवसायाला उभारी मिळाली आहे.
– राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ