पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा येत्या 14 ते 29 ऑगस्ट दरम्यान भरत नाट्य मंदिरात रंगणार आहे. दरवर्षी 51 महाविद्यालयांच्या संघांमध्ये ही स्पर्धा होते. मात्र, यंदा 15 नवीन महाविद्यालयांच्या संघाचा प्रवेश निश्चित झाला असून, सहा महाविद्यालयांचे संघ अजूनही प्रतीक्षा यादीत आहे.
संघाच्या प्रवेशपत्रिका 3 आणि 4 ऑगस्टला स्वीकारल्या जाणार असून, यंदा या स्पर्धेत किती महाविद्यालये सहभागी होतील, हे 7 ऑगस्टला स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा दरवर्षी ऑगस्टमध्ये रंगते. तत्पूर्वी, त्यात सहभागी होण्यासाठी प्रवेशपत्रिकेचे वाटप केले जाते. यंदा 14 आणि 15 जुलैला प्रवेशपत्रिकेचे वाटप करण्यात आले. स्पर्धेत दरवर्षी 51 महाविद्यालयांच्या संघात स्पर्धा होते.
त्यातील 41 संघ स्पर्धेत पुढील वर्षीही सहभाग घेतात, तर सुधारणेला वाव असलेल्या 10 संघांची निवड परीक्षकांकडून करण्यात येते. यंदा 21 नवीन महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यापैकी 15 महाविद्यालयांचा प्रवेश निश्चित झाला आहे, तर 6 महाविद्यालये अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त मंगेश शिंदे म्हणाले, "तीन आणि चार ऑगस्टला प्रवेशपत्रिका देताना कोणती महाविद्यालये आली नाही, तर प्रतीक्षा यादीतील महाविद्यालयांची वर्णी येथे लागू शकते. येत्या 7 ऑगस्टला संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल."
या महाविद्यालयीन संघांचा प्रवेश निश्चित
डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल
रत्नाई महाविद्यालय (राजगुरुनगर)
प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स
एआयएसएसएमएसआयओआयटी
पीआयसीटी
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालय (आकुर्डी)
आर. बी. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर
ट्रिनिटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग
झील अभियांत्रिकी महाविद्यालय
ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (आकुर्डी)
अण्णासाहेब मगर महाविद्यालय (हडपसर)
पीव्हीजीसीओईटी
सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स