पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे ही भारतातील आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था मानली जाते. देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न येथून मिळत आहे. शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला, उद्योग, तंत्रज्ञान, उत्पादन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी पुणे विमानतळाला आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असणे आता गरजेचे झाले आहे. बजाज ऑटो, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन आणि फोर्स मोटर्स यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्यांनी पुणे शहर आणि परिसरात अन राज्यात त्यांच्या ग्रीनफिल्ड सुविधा उभारल्या आहेत.
तसेच, इन्फोसिस, टीसीएस आणि कॅपजेमिनी, आयबीएम, रॉकवेल ऑटोमेशन, टेक महिंद्रा इत्यादीसारख्या अनेक नामांकित आयटी कंपन्यांचेदेखील पुण्यात आहेत. यासोबतच अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रे यांच्या उपस्थितीमुळे पुण्याचे वर्णन पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून केले जाते. हे शहर देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले आहे. त्यामुळे पुण्यातून परदेशात व परदेशातून पुण्यात प्रवास करणार्याची संख्या लक्षणीय आहे. कोरोनापूर्वी पुण्यातून 4 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत होती. परंतु, सध्या पुण्यातून फक्त एकच आंतरराष्ट्रीय विमान सुरू आहे. हे विमान पुण्याहून थेट दुबईला शारजाह येथे जात आहे.
मुंबई, दिल्लीकडे होणारी धावपळ वाचणार…
सध्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करायचा असेल, तर पुणेकरांना मुंबई व दिल्ली विमानतळावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील प्रवाशांची गर्दी मुंबई व दिल्ली विमानतळावर वाढत आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली विमानतळावर प्रचंड ताण येत आहे. पुण्यातूनच जर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळाली, तर मुंबई, दिल्ली विमानतळावरील ताण नक्कीच कमी होणार असून, पुणेकरांची मुंबई, दिल्लीकडे होणारी धावपळ वाचणार आहे.
पुणेकरांच्या सोयीकरिता पुणे विमानतळावरून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू करण्याची मागणी आम्ही केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नुकतीच केली आहे. पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळाल्यास पुणेकर नागरिकांना नक्कीच फायदा होणार असून, शहराच्या अर्थव्यवस्थेला चालन मिळणार आहे.
– खा. गिरीश बापट, अध्यक्ष, विमानतळ सल्लागार समितीपुण्याहून सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, अबुधाबी, दुबई यांसारख्या देशांना आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळाल्यास, प्रवाशांना तेथून पुढे पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना जाणे सोपे होणार आहे. याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत.
– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ