पुणे

पुण्यात मातब्बरांना आता पुन्हा ‘कुणबी’च तारणार; पालिकेच्या ओबीसी आरक्षित जागेवर निवडणुकीचा मार्ग सुकर

अमृता चौगुले

पांडुरंग सांडभोर

पुणे : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणामुळे शहरातील अनेक मातब्बर अडचणीत येणार असले, तरी कुणबी जातीच्या दाखल्यामुळे मात्र अनेकांना राजकीय जीवनदान मिळणार आहे. सर्व पक्षांतील प्रमुख माजी नगरसेवकांकडे कुणबी जातीचा दाखला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविण्याचा त्यांचा मार्ग मोकळाच राहणार आहे. पुणे महापालिकेच्या 58 प्रभागांतील 46 जागांसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामध्ये अनेक प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे वर्षानुवर्षे निवडून येणारे आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मातब्बर माजी नगरसेवक अडचणीत आल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमधील प्रस्थापित माननीयांचा समावेश अधिक आहे.

मात्र, यामधील अनेकांकडे 'कुणबी' जातीचा दाखला असून, त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढण्यासाठी हाच दाखला तारणहार ठरणार आहे. प्रामुख्याने वडगाव शेरी मतदारसंघातील सर्वच पक्षांतील प्रमुख इच्छुकांच्या प्रभागांत ओबीसी आरक्षण पडले आहे. मात्र, यामधील पठारे, टिंगरे, मुळीक, म्हस्के, गलांडे, खांदवे, कळमकर, भगत या सर्वच इच्छुकांकडे कुणबीचा दाखला असून, आरक्षणानंतर ते निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत. त्यामुळे महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, सुमन पठारे, योगेश मुळीक, उषा कळमकर, सुनीता गलांडे, श्वेता खोसे गलांडे, हे ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढवू शकणार आहेत.

हडपसर मतदारसंघात मुंढव्यातील गायकवाड, लोणकर, हडपसरमधील तुपे, मगर, भानगिरे, बांदल, ढोरे, घुले, लोणकर हेसुध्दा सगळे कुणबी ओबीसी आहेत. त्यामुळे मुंढवा प्रभाग क्र. 21 मध्ये एकही सर्वसाधारण जागा नसली तरी उमेश गायकवाड, बंडूतात्या गायकवाड यांना ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढता येणार आहे. तर, प्रभाग क्र. 46 मधून शिंदे गटात गेलेले सेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे हे केवळ कुणबीमुळेच निवडणुकीच्या रिंगणात कायम असतील, याशिवाय नंदा लोणकर, ईशान तुपे, हेमलता मगर या सर्वच इच्छुकांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

खडकवासला मतदारसंघातही तांबे, धनकवडे, बराटे, जगताप, चरवड, बेलदरे, तापकीर हे कुणबीधारक आहेत. त्यामुळे आता विशाल तांबे, युवराज बेलदरे, दिलीप बराटे, वर्षा तापकीर, प्रसन्न जगताप यांच्या प्रभागातील ओबीसी आरक्षित जागांमधून; तर पर्वती मतदारसंघात राजेंद्र शिळीकर, दिनेश धाडवे, दत्ता धनकवडे निवडणूक लढवू शकणार आहेत. कोथरूड मतदारसंघात मोकाटे, सुतार, निम्हण, मानकर, बालवडकर, चांदेरे, केमसे, दगडे पाटील, मराठे, माथवड, मेंगडे हे सर्वच कुणबी ओबीसीधारक असून, आता त्यांना आरक्षणाचा फटका बसणार नाही. शिवाजीनगरमध्ये बोडके, निकम यामधील काही प्रमुख इच्छुकांकडे; तर कसबा मतदारसंघात कोंढरे, पुणे कँटोन्मेंटमध्ये वागसकर, गायकवाड हेही कुणबीधारक आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील ओबीसीच्या जागांवर कुणबी दाखलाधारकांना संधी मिळू शकणार आहे.

कुणबीधारक प्रमुख इच्छुक कुटुंबीय
पठारे, मुळीक, टिंगरे, गलांडे, खांदवे, तुपे, मगर, भानगिरे, जगताप, लोणकर, मानकर, दगडे, बालवडकर, निम्हण, कोंढरे, मेंगडे, चरवड, धनकवडे, शिळीमकर, तांबे, बेलदरे, बाबर, सुतार, मोकाटे, धाडवे, बराटे, कळमकर, भगत, मराठे, वागस्कर, केमसे, राणे, हनमगर, तापकीर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT